हिमालयाएवढ्या दुःखाचा सामना करणाऱ्या प्रत्येक नेपाळवासियांचे अश्रू आम्ही पुसणार, असे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले आहे. ते रेडिओवरील मन की बात या कार्यक्रमात बोलत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज जड अंतःकरणाने मन की बात कार्यक्रमाला संबोधित केले. १२५ कोटी भारतीय नेपाळला आपला समजतात. या दुःखाच्या प्रसंगी आम्ही तुमच्यासोबत आहोत, असे मोदी यांनी म्हटले आहे.
मन की बातमध्ये मोदी म्हणाले, नेपाळमध्ये मदत पोहचविण्यास भारताने सुरवात केली आहे. नागरिकांना वाचविण्यास आमचे प्राधान्य आहे. बचावकार्यासाठी विशेषतज्ज्ञ लोकांना पाठविण्यात आले आहे. जास्तीत जास्त नागरिकांना वाचविण्यास आमचे प्राधान्य आहे.  गुजरातमध्ये २६ जानेवारी २००१ मध्ये कच्छ परिसरात झालेला भूकंप मी जवळून पाहिलेला आहे. त्यामुळे ही नैसर्गिक आपत्ती किती भयानक असते, याची मी कल्पना करू शकतो. नेपाळच्या या दुःखात भारत पण सहभागी आहे. आपण सर्वांनी नेपाळी नागरिकांचे अश्रू पुसण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मदतीसाठी भारत सदैव नेपाळच्या पाठीशी उभे असेल, असेही ते म्हणाले.
त्याचसोबत, बँडमिंटनपटू सायना नेहवाल आणि टेनिसस्टार सानिया मिर्झा या भारताच्या दोन मुलींनी देशाचे नाव उंचावल्याने मोदींनी त्यांचे तोंड भरून कौतुक देखील केले. तसेच वर्ल्डपकमध्ये ऑस्ट्रेलियाकडून भारताचा झालेल्या पराभवानंतर नागरिकांनी खेळाडूंबद्दल दिलेल्या प्रतिक्रियांवर मोदी यांनी नाराजी जाहीर केली.