रेल्वेगाड्यांचा वेग वाढवून ६०० किलोमीटर प्रतितासापर्यंत नेण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न असल्याचे रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी म्हटले आहे. रेल्वे गाड्यांचा वेग वाढवण्यासाठी अॅपल कंपनीचे सहकार्य घेतले जाणार असून त्याबद्दल कंपनीसोबत चर्चा सुरु आहे, अशी माहिती प्रभू यांनी दिली. ‘दिल्ली-मुंबई आणि दिल्ली-कोलकाता या रेल्वेमार्गांवरुन सर्वाधिक वाहतूक चालते. त्यामुळे नीती आयोगाने या मार्गावरील एक्स्प्रेस गाड्यांचा वेग वाढवण्यासाठी १८ हजार कोटी रुपयांचा निधी मजूर केला आहे,’ असेदेखील प्रभू यांनी सांगितले.

‘नीती आयोगाने रेल्वेच्या प्रस्तावाला मंजुरी दिल्यामुळे गतिमान एक्स्प्रेसचा वेग वाढून २०० किलोमीटर प्रतितास होईल. यामुळे प्रवाशांच्या वेळेत मोठी बचत होईल,’ असे असोचेमने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात बोलताना सुरेश प्रभू यांनी म्हटले. ‘रेल्वेचा वेग ६०० किलोमीटर प्रतितास करण्याच्या दिशेने सहा-आठ महिन्यांपासून पावले टाकली जात आहेत. यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावरील अॅपलसारख्या कंपन्यांसोबत बातचीत सुरु आहे,’ असे त्यांनी सांगितले.

‘अॅपलसारख्या प्रख्यात कंपन्यांसोबतच रेल्वे मंत्रालयाची चर्चा सुरु आहे. देशात तंत्रज्ञानाची आयात केली जाणार नाही, तर तंत्रज्ञानाचा विकास केला जाईल,’ असे असोचेमच्या कार्यक्रमात बोलताना रेल्वेमंत्र्यांनी म्हटले. सुरक्षा हा रेल्वे प्रवासातील महत्त्वपूर्ण विषय आहे, हेदेखील प्रभू यांनी अधोरेखित केले. ‘रेल्वे प्रवासादरम्यान सुरक्षा प्राधान्याचा विषय आहे. रेल्वेच्या डब्यांमध्ये काही तांत्रिक बिघाड झाल्यास त्याची सूचना देणारे तंत्रज्ञान विकसित करण्याचे प्रयत्न सुरु आहेत,’ अशी माहितीही प्रभू यांनी दिली.