ब्रिटनमधील एका भारतीय रेस्टॉरंटला न्यायालयाने दंड ठोठावण्यात आला आहे. रेस्टॉरंट शेजारी राहणाऱ्या व्यक्तींनी करीच्या वासामुळे त्रास होत असल्याची तक्रार केल्याने रेस्टॉरंट मालकाला दंड ठोठावण्यात आला. मिडल्सब्रो न्यायालयाने खुशी इंडियन बफे रेस्टॉरंटचे मालक शबाना आणि मोहम्मद खुशी यांना दंड भरण्याचे आदेश दिले आहेत. बिर्याणी आणि भाज्यांचा वास रेस्टॉरंटबाहेर येत असल्याने न्यायालयाकडून दंड ठोठावण्यात आला आहे.

संबंधित रेस्टॉरंटमधील फिल्टरेशन यंत्रणा सदोष होती. त्यामुळे रेस्टॉरंटमध्ये बनवल्या जाणाऱ्या अनेक खाद्यपदार्थांचा वास बाहेर येत होता. याबद्दल आसपास राहणाऱ्या अनेकांनी रेस्टॉरंटविरोधात तक्रार केली होती. त्यामुळेच न्यायालयाने रेस्टॉरंटच्या मालकांना दंड भरण्याचे आदेश दिले. असे वृत्त गॅझेट लाईव्ह या वृत्तपत्राने दिले आहे.

पंजाबी खाद्यपदार्थ ही रेड रोज पब परिसरात असलेल्या खुशी रेस्टॉरंटची खासियत आहे. नागरी वसाहतीत असलेल्या खुशी इंडियन बफे रेस्टॉरंटविरोधात स्थानिकांनी तक्रारी केल्या होत्या. रेस्टॉरंटमध्ये तयार करण्यात येणाऱ्या पदार्थांचा वास रेस्टॉरंटच्या किचनमधून बाहेर येत असल्याने त्याचा त्रास होत असल्याची तक्रार स्थानिकांनी केली होती. त्याची दखल न्यायाधीश क्रिस्टिना हॅरिसन यांनी घेतली. हॉटेलमधून निघणारा खाद्यपदार्थांचा वास इतका तीव्र होता की त्यामुळे लोकांना कपडे धुवावे लागतात, अशा तक्रारी स्थानिक प्रशासनाकडे आल्या होत्या. याप्रकरणी खुशी रेस्टॉरंटच्या मालकांना २५८ पाऊंड्सचा दंड भरण्याचे आदेश दिले आहेत. यासोबतच न्यायालयीन खर्च म्हणून ५०० पाऊंड्स भरण्याचे आदेश दिले आहेत.

‘खुशी रेस्टॉरंट पब बिल्डिंगमध्ये हलवण्यात आले. त्यावेळी या रेस्टॉरंटमध्ये बदल करण्याची आवश्यकता नव्हती. त्यामुळे खुशी रेस्टॉरंटच्या मालकांकडून कोणतेही बदल करण्यात आले नाहीत,’ असा युक्तीवाद बचाव पक्षाचे वकील नील डग्लस यांनी केला. रेस्टॉरंट परिसरात असलेल्या काही दुकानदारांनी करीच्या वासामुळे कोणताही त्रास होत नसल्याचे पत्र न्यायालयाला दिले होते. मात्र न्यायालयाने खुशी रेस्टॉरंटच्या मालकांना दोषी धरत दंड भरण्याचे आदेश दिले.