मिनी लोकसभा म्हणून ज्या निवडणुकीकडे बघितले जाते, त्या उत्तर प्रदेश विधानसभेची निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर आली आहे. या निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी आपली कंबर कसली असली, तरी उत्तर प्रदेशमधील सध्याचा सत्ताधारी समाजवादी पक्षच सद्यस्थितीत सर्वाधिक जागा मिळवेल, असे काही ओपिनियन पोल्समधून पुढे आले आहे. हे निकाल तूर्ततरी समाजवादी पक्षाला दिलासा देणारे आहेत. उत्तर प्रदेशमध्ये अद्याप अॅंटिइन्कमबन्सी घटक तितका परिणामकारक नाही. त्यामुळे मतदार पुन्हा एकदा समाजवादी पक्षाच्या पारड्यातच आपले मत टाकतील, असे या सर्वेक्षणातून दिसून आले. सर्वेक्षणातील आणखी एक विशेष बाब म्हणजे उत्तर प्रदेश निवडणुकीसाठी काँग्रेसने खूप लवकर तयारी सुरू केली असली, तरी त्याचा फारसा फायदा पक्षाला होणार नाही. काँग्रेस पक्ष उत्तर प्रदेशमध्ये चौथ्या स्थानावरच राहील, असाही निष्कर्ष काढण्यात आला आहे.
एबीपीन्यूज-लोकनीती, सेंटर फॉर द स्टडी ऑफ डेव्हलपिंग सोसायटीज यांनी हे सर्वेक्षण केले. यामध्ये जर आत्ता उत्तर प्रदेशमध्ये निवडणुका झाल्या तर ३० टक्के मतदारांनी समाजवादी पक्षाच्या पारड्यातच आपले मत टाकण्याचे निश्चित केले आहे. त्यामुळे समाजवादी पक्षाला १४१-१५१ जागा मिळू शकतात. दुसऱ्या क्रमांकावर भाजप असून, या पक्षाला १२४-१३४ तर बहुजन समाज पक्षाला १०३-११३ जागा मिळतील, असे सर्वेक्षणातून दिसून आले. त्याचबरोबर काँग्रेसला अवघ्या ८-१४ जागाच मिळतील, असाही निष्कर्ष सर्वेक्षणातून काढण्यात आला आहे. उत्तर प्रदेशमध्ये सत्तेवर येण्यासाठी कोणत्याही पक्षाला २०२ची मॅजिक फिगर गाठणे आवश्यक आहे. पण तूर्ततरी कोणताच पक्ष स्वबळावर हा आकडा गाठेल, असे दिसत नाही. त्यामुळे या स्थितीत नवी राजकीय समीकरणेही मांडली जाऊ शकतात.