मंगळवारी देश १७वा ‘कारगिल विजय’ दिवस साजरा करतो आहे. इतिहासात हा विजय सोनेरी अक्षरात लिहण्यासारखा आहे. परंतु हा इतिहास सोनेरी अक्षरात लिहण्यासाठी मात्र काही अडचणी येत आहेत. गेल्यावर्षी जानेवारी महिन्यात कारगिल युद्धाचा विजयी इतिहास लिहण्यासाठी एक प्रकल्प सुरु करण्यात आला, दोन वर्षात हा प्रकल्प पूर्ण होणार होता. हा विजयी इतिहास लिहण्याची जबाबदारी प्रसिद्ध इतिहासकार श्रीनाथ राघवन यांच्यावर सोपवली होती. पण या युद्धात महत्त्वाची भूमिका असणा-या सैन्याने मात्र या मोहिमेबद्दलची अधिकृत माहिती इतिहास विभागाला सांगण्यास नकार दर्शवला आहे. सेनेच्या डीजीएओने या युद्धाबद्दलची काही माहिती इतिहास विभागाला पाठवली आहे. पण काही माहिती आणि दस्ताऐवज द्यायला मात्र नकार दर्शवला आहे. डीजीएमओने आपली वॉर डायरी द्यायला देखील नकार दिला आहे. या दस्ताऐवजांमध्ये युद्धासंबधीची गोपनीय माहिती आहे. भविष्यात युद्धाच्या वेळी या माहितीचा उपयोग होऊ शकतो असे सांगत ही माहिती खुली करण्यासाठी नकार देण्यात आल्याचे समजते आहे.
कारगिलचा युद्धाचा विजय हा इतिहासात लिहण्यासारखाच आहे. पण काही गोष्टी या युद्ध रणनिताचा भाग असतात. सेना कुठे तैनात करण्यात आली आहे, त्यांच्या शस्त्रास साठे याची सगळी माहिती यात आहे आणि सुरक्षेचा विचार करता ही माहिती सार्वजनिक करू शकत नाही अशी बाजू सैन्याने मांडली आहे. संरक्षण मंत्रालय २०१४ पासून या युद्धाचा इतिहास लिहण्याचा विचार करत आहेत. यासाठी २०१४ मध्ये इतिहासकार श्रीनाथ राघवन यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले होते. या प्रकल्पाची सुरूवात २०१५ मध्ये करण्यात आली असून या संपूर्ण इतिहासाची माहिती वर्षाअखेरपर्यंत सादर करायची होती. यासाठी राघवन यांच्यासोबत काही करार करण्यात आले असून सगळ्या दस्ताऐवजांचा अभ्यास फक्त इतिहास विभागात करण्याचे बंधन त्यांच्यावर घालण्यात आले आहे. तसेच ही माहिती गोपनिय राहावी यासाठी इतिहास लिहण्याकरता फक्त अधिकृत संगणकच त्यांना देण्यात आल्याचे समजते आहे.