धर्मावर बोलल्यामुळे केरळमध्ये एका प्राध्यापिकेला व लेखकाला धमक्या देण्याचा प्रकार घडला आहे. मल्याळम लेखकाने हिंदू-मुस्लिम एकतेवर लेख लिहिला होता. आता त्यांना इस्लाम धर्मात प्रवेश घ्या अन्यथा परिणामांना सामोरे जा अशी धमकी दिली आहे. तर एका प्राध्यापिकेने प्रसिद्ध चित्रकार दिवंगत एम.एफ.हुसेन यांनी काढलेले सरस्वतीचे चित्र योग्य असल्याचे म्हटल्यामुळे त्यांच्यावर अॅसिड फेकण्याची धमकी सोशल मीडियावर देण्यात आली आहे. दोन्ही घटनांची पोलिसांत नोंद झाली असून तपास सुरू आहे.

हिंदू मुस्लिम एकतेवर लिहिणाऱ्या लेखकाचे नाव के.पी.रमनउन्नी आहे. त्यांना धमकीचे पत्र मिळाले आहे. आम्ही तुला सहा महिन्यांचा वेळ देत आहोत. इस्लाम धर्म स्वीकार. जास्त काळ आमच्यापासून लपून राहू शकणार नाहीस. लवकरच तुला पाच वेळा नमाज पठण करावी लागेल. रोजा ठेवण्यासाठी तयार हो. नाहीतर तुला तीच शिक्षा मिळेल जी इस्लाम न मानणाऱ्यांना दिली जाते. तुझे लेख वाचून लोक भ्रमित झाले आहेत, असे या पत्रात म्हटले आहे. हे धमकीचे पत्र त्यांना एका मुस्लिम संघटनेने दिले आहे.

रमनउन्नी कोझिकोड येथे राहतात. रमजानच्या काळात त्यांनी काही लेख लिहिले होते. हिंदू मुसलमानांचे शत्रू नाहीत, असे त्यांनी आपल्या लेखात म्हटले होते. रमजानच्या काळात आपल्या लेखाचे इतके कौतुक झाले होते. पण अचानक असे काय झाले की मला धमकी येऊ लागली, असा प्रश्न रमनउन्नी यांना पडला आहे. रमनउन्नी यांना प्रोफेसर टी.जी.जोसेफ यांच्यासारख्या परिणामांना सामोरे जाण्याची धमकी देण्यात आली आहे. २०१० मध्ये जोसेफ यांनी प्रेषित मोहम्मद यांचा अपमान केल्याचा आरोप करत त्यांचा हातच कापण्यात आला होता.

केरळमधीलच वर्मा महाविद्यालयाच्या प्रोफसेर दीपा निसांथ यांनाही हिंदुत्ववादी संघटनांनी धमकी दिली आहे. त्यांनी एसएफआय या विद्यार्थी संघटनेने लावलेल्या पोस्टरचे समर्थन केले होते. यामध्ये एम.एफ.हुसेन यांनी आपल्या चित्रात सरस्वती काढली होती. त्याला दीपा यांनी पाठिंबा दिला होता. या पेंटिगमुळे हिंदूत्ववादी संघटना चिडल्या होत्या. सरस्वती देवीला आक्षेपार्ह स्थिती दाखवून हुसेन यांनी हिंदू धर्माचा अपमान केला आहे, असा दावा या संघटनांनी केला होता. दीपा यांच्या तक्रारीनुसार, फोटोशॉप केलेला त्यांचा एक आक्षेपार्ह अवस्थेतील एक फोटो या संघटनांनी सोशल मीडियावर टाकला आहे.