नोटाबंदीच्या निर्णयाला महिन्याभराचा कालावधी उलटूनही अद्याप सामान्य माणसासमोरील चलन तुटवड्याचे संकट कायम आहे. त्यामुळे आधी नोटाबंदीच्या निर्णयाचा स्वागत करणारा सामान्य माणूस आता मात्र संतप्त झाला आहे. त्यामुळे लोकांच्या मनातील संताप करण्यासाठी भाजपकडून दिल्लीत लाडू वाटण्यात आले. मात्र भाजपच्या या लाडू उपक्रमाचा ट्विटरवर चांगलाच समाचार घेण्यात आला आहे. घरोघरी जाऊन लाडू वाटणाऱ्या भाजपच्या कार्यकर्त्यांची ट्विटरवर खिल्ली उडवली जाते आहे. लड्डू खाओ, भाजप भगाओ, असा हॅशटॅग वापरत ट्विटरवर भाजपच्या लाडू वाटप अभियानाची ट्विटरवर खिल्ली उडवण्यात आली आहे.

एका ट्विटर वापरकर्त्याने ‘भाजप रांगेत उभ्या राहणाऱ्या लोकांना लाडू वाटत आहे. मित्रों, हे मोतीचूरचे लाडू नाहीत, तर मोदीचोरचे लाडू आहेत,’ असे ट्विट केले आहे. तर तन्वी नावाच्या एका ट्विटर वापरकर्तीने ‘नोटबंदीचे लाडू लग्नाच्या लाडूंपेक्षाही जास्त वाईट आहेत,’ असे म्हटले आहे. अनेक वापरकर्त्यांनी भाजपच्या लाडू वाटपावर मजेशीर ट्विप्पणी केली आहे.

देशभराप्रमाणेच दिल्लीमधील लोकही एटीएम समोरील रांगांमध्ये उभे आहेत. पैशांसाठी हालअपेष्टा सहन कराव्या लागणाऱ्या लोकांच्या मनातील रोष लक्षात घेता दिल्ली भाजपने एटीएमसमोर उभ्या असणाऱ्या लोकांना लाडू वाटण्याचा निर्णय घेतला. एटीएमसमोर संयमीपणे उभ्या राहणाऱ्या लोकांचे आभार मानण्यासाठी भाजपकडून लाडू वाटण्यात आले.

‘पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काळा पैसा संपुष्टात आणण्यासाठी ऐतिहासिक पाऊल उचलले आहे. त्रास होत असनूही लोकांनी या निर्णयाला पाठिंबा दिला आहे. लोकांनी नोटाबंदील्या दिलेल्या समर्थनाबद्दल आम्ही त्यांचे आभार व्यक्त करत आहोत. त्यामुळेच भाजपचे कार्यकर्ते घरोघरी जाऊन मिठाई वाटत आहेत. १० जानेवारीपर्यंत अशाप्रकारे मिठाईचे वाटप करण्यात येईल,’ अशी माहिती दिल्ली भाजपचे प्रमुख मनोज तिवारी यांनी दिली आहे.

मागील आठवड्यात भाजपच्या कोअर टिमने नोटबंदीबद्दलचा आपला अहवाल दिला आहे. दर मंगळवारी आयोजित केल्या जाणाऱ्या बैठकीमध्ये कोअर टिमकडून नोटाबंदीबद्दलचा अहवाल दिला जातो. ‘नोटाबंदीविषयीचे लोकांचे मत आता आधीइतके चांगले राहिलेले नाही. नोटाबंदीचा निर्णय चांगला होता. मात्र ज्याप्रकारे हा निर्णय अंमलात आणला गेला, त्यामुळे लोकांमध्ये संताप आहे. व्यावसायिकांना मोठा फटका बसला आहे,’ अशी माहिती भाजपच्या एका वरिष्छ नेत्याने दिली आहे.