उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत समाजवादी पक्षाचे समर्थन करणाऱ्या राष्ट्रीय जनता दलाकडून भाजपसह पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार टीका करण्यात आली आहे. ‘भाजपचा अर्थ भारत जलाओ पार्टी आहे,’ अशी घणाघाती टीका राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांनी केली आहे. ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे जुळे भाऊ आहेत,’ अशा शब्दांमध्ये लालू प्रसाद यादव यांनी पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल केला आहे.

‘पंतप्रधान प्रचंड खोटे बोलतात. एक दिवस त्यांना उत्तर प्रदेशची जनता धक्के मारुन इथून पळवून लावेल आणि गुजरातमध्ये पाठवेल,’ असे म्हणत लालू प्रसाद यादव यांनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला. उत्तर प्रदेशातील देवरियामध्ये समाजवादी पक्षाचा प्रचार करताना लालू प्रसाद यांनी पंतप्रधान मोदींसह भाजपवर शरसंधान साधले. ‘माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी व्यक्ती म्हणून आणि राजकीय नेते खूप चांगले आहेत. मात्र भाजप आपल्या पोस्टरवर त्यांचे एकही छायाचित्र लावलेले नाही. पंतप्रधान मोदी हुकूमशाहा आहेत. मोदी त्यांची छाती ५६ इंचाची असल्याचे सांगतात. मात्र ५६ इंचाची छाती फक्त यादवांची असते, हे त्यांना माहित नाही. मी मोदींच्या छातीचे माप घेतले, तेव्हा ती फक्त ३२ इंचाची होती,’ असे लालूप्रसाद यादव यांनी म्हटले.

‘पंतप्रधान मोदी भाईयों-बहनों म्हणत भोळ्या भाबड्या जनतेला खोटी आश्वासने देऊन मूर्ख बनवतात. भाजपने २०१४ मध्ये निवडणुकीवेळी अनेक आश्वासने दिली. मात्र ही आश्वासने भाजपला अद्याप पूर्ण करता आलेली नाहीत,’ अशा शब्दांमध्ये लालू प्रसाद यादव यांनी पंतप्रधानांवर टीका केली. उत्तर प्रदेशात भाजप सरकार स्थापन करेल, या पंतप्रधान मोदी यांच्या दाव्याचा लालू प्रसाद यादव यांनी समाचार घेतला. ‘निवडणुकीच्या प्रचारसभांमधून पंतप्रधान मोदी जनतेला भ्रमित करत आहेत. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत बिहार, उत्तर प्रदेश आणि कोलकात्याची जनता पंतप्रधान मोदींना सत्तेतून बाहेर करेल,’ असे लालू प्रसाद यादव यांनी म्हटले.

‘नोटाबंदीचा निर्णय घेऊन पंतप्रधान मोदी यांनी देशवासीयांना नाहक त्रास दिला आहे. भाजपने नोटाबंदीचा आधार घेत त्यांच्याकडे असणारा काळा पैसा पांढरा केला. बिहारमधून पंतप्रधान मोदींची पिछेहाट सुरू झाली आहे. आता उत्तर प्रदेशची जनता त्यांना गुजरातचा रस्ता दाखवेल,’ अशा शब्दांमध्ये लालू प्रसाद यादव यांनी पंतप्रधान मोदींवर जोरदार टीका केली.