तामिळनाडूच्या दिवंगत मुख्यमंत्री जयललिता यांचा मुलगा असल्याचा दावा करणाऱ्या व्यक्तीला अटक करण्याचे आदेश मद्रास हायकोर्टाने दिले आहेत. खोटी माहिती देणाऱ्या या व्यक्तीवर योग्य ती कारवाई करावी असे हायकोर्टाने म्हटले आहे. हायकोर्टाच्या आदेशानंतर पोलिसांनी त्या व्यक्तीला अटक केली आहे.

तामिळनाडूतील एका व्यक्तीने जयललिता यांचा मुलगा असल्याचा दावा करत हायकोर्टात धाव घेतली. शशिकला गटाकडून धमक्या येत असल्याने संरक्षण मिळावे अशी मागणीही या व्यक्तीने केली होती. याप्रकरणावर सोमवारी झालेल्या सुनावणीत न्यायालयाने निकाल दिला. पोलिसांनी हायकोर्टात सीलबंद अहवाल सादर केला होता. ‘याचिकाकर्ता हा कृष्णमूर्ती आणि वसंतमणीचा मुलगा असून तो जयललितांचा मुलगा नाही’ असे या अहवालात म्हटले होते. संबंधीत व्यक्तीने सुब्रमण्यम नावाच्या व्यक्तीकडून जुने स्टॅम्पपेपर विकत घेतले होते असा उल्लेखही या अहवालात करण्यात आला होता. या अहवालाच्या आधारे हायकोर्टाने संबंधीत व्यक्तीवर कारवाईचे आदेश दिले. याचिकाकर्त्याने फक्त हायकोर्टाची दिशाभूल केली नाही. तर त्याने बनावट कागदपत्रही तयार केले. त्यामुळे पोलिसांनी त्याला अटक करुन योग्य ती कारवाई करावी असे आदेश हायकोर्टाने दिले.

तामिळनाडूच्या दिवंगत मुख्यमंत्री जयललिता यांचा मी मुलगा आहे असा दावा एका व्यक्तीने केला होता. त्यांची संपत्ती मला मिळावी असे देखील त्याने म्हटले होते. जयललिता आणि अभिनेता शोगून बाबू हे आपले पालक आहेत असे त्याने म्हटले. त्याने काही कागदपत्रे देखील जोडली आणि जयललिता यांच्यासोबतचा एक फोटो देखील त्याने त्या कागदपत्रांसोबत जोडला होता. जयललिता यांनी कृष्णमूर्तीला दत्तक दिले होते असे त्या कागदपत्रांमध्ये लिहिले होते. त्या कागदपत्रांवर एम. जी. रामचंद्रन यांची स्वाक्षरी आहे. त्यावर १९८५ मधील तारिख होती. गेल्या वेळी झालेल्या सुनावणीत न्यायाधीशांनी या तारखेवर संशय व्यक्त केला होता. त्या वर्षी रामचंद्रन हे दुर्धर आजाराने ग्रस्त होते आणि हात देखील हलवू शकत नव्हते. तर त्यांची सही यावर कुठून आली असा सवाल न्यायालयाने उपस्थित केला होता.