निवृत्तीनंतर मिळकतीचा खात्रीशीर मार्ग म्हणून भारतातील नोकरदार वर्गाचा भर बँकेतील रोख ठेवी आणि दुसरे घर घेण्यावर असल्याचे एचएसबीसीने केलेल्या पाहणीत आढळून आले आहे.
पाहणीत सहभागी झालेल्या भारतातील ८८ टक्के नोकरदारांनी सांगितले की, बँक किंवा एखाद्या न्यासामध्ये जमा केलेल्या रोख ठेवी हा त्यांना निवृत्तीनंतर पैशाची सोय करण्याचा खात्रीशीर मार्ग वाटतो. जगातील अन्य देशांच्या तुलनेत हे प्रमाण बरेच अधिक आहे. इंडोनेशियात हेच प्रमाण ८२ टक्के तर अमेरिका आणि ब्रिटनमध्ये अनुक्रमे ६४ आणि ५६ टक्के आहे.
तसेच निवृत्तीनंतर घरभाडय़ाच्या स्वरूपात पैशाचा स्रोत कायम राहावा या उद्देशाने दुसरे घर घेण्यास भारतातील ८५ टक्के नोकरदारांनी पसंती दिली. इंडोनेशियात हे प्रमाण ९० टक्के, अमेरिकेत ५४ आणि ब्रिटनमध्ये ६० टक्के आहे.
विविध विमा योजना, वैयक्तिक निवृत्तिवेतन योजना आणि कामगार निवृत्तिवेतन योजना यांत गुंतवणूक करणाऱ्यांचे प्रमाण अनुक्रमे ८१, ८० आणि ७६ टक्के आहे.
आमच्या पाहणीत असे दिसून आले की, केवळ एकाच गोष्टीवर विसंबून राहणे खात्रीचे नाही हे अखेर भारतीयांच्या लक्षात येऊ लागले आहे. तसेच भविष्यासाठी आपण फारशी बचत करू शकत नसल्याचेही त्यांना उमगले आहे. त्यामुळे ते निवृत्तीनंतरची सोय म्हणून विविध पर्यायांचा विचार करत आहेत, असे एचएसबीसीच्या रिटेल बँकिंग आणि वेल्थ मॅनेजमेंट विभागाचे भारतातील अध्यक्ष संजीव सूद यांनी सांगितले.
घरासाठी तारण ठेवल्याने, मुलांच्या शिक्षणाच्या खर्चामुळे तसेच आर्थिक मंदी, मिळकतीतील घट, बेरोजगारी आणि आजारपण किंवा अपघात यामुळे भविष्याची सोय म्हणून पैशाची बचत करण्यात अडचणी येत असल्याचेही अनेकांचे मत आहे.