सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांची प्रकृती चांगलीच खालावली आहे, सरदार सरोवर धरणाची उंची कमी करण्यात यावी या मागणीसाठी गेल्या ९ दिवसांपासून मेधा पाटकर आणि त्यांचे कार्यकर्ते उपोषणाला बसले आहेत. मेधा पाटकर आणि इतर ११ कार्यकर्त्यांना कमी रक्तदाबाचा त्रास जाणवू लागला आहे. तसंच त्यांच्या शरीरातील पाण्याचं प्रमाणही कमी झालं आहे. सरदार सरोवरावर बांधण्यात येणाऱ्या धरणाची उंची वाढविल्यानं धरण क्षेत्रातील ज्या कुटुंबांच्या अडचणी वाढणार आहेत त्यांना त्यांचा हक्क मिळालाच पाहिजे अशी आग्रही मागणी मेधा पाटकर यांनी केली आहे.

सरदार सरोवरावर बांधण्यात येणाऱ्या धरणाची उंची वाढविल्यानं १९२ गावं आणि ४० हजार कुटुंबांच्या अडचणी वाढणार आहेत. सर्वोच्च न्यायालयानं ३१ जुलै रोजी सगळ्यांच्या पुनर्वसनाचे आदेश दिले आहेत, मात्र अजूनही पुनर्वसन मुळीच करण्यात आलेलं नाही त्याचमुळे मेधा पाटकर आणि त्यांच्या ११ कार्यकर्त्यांनी उपोषण सुरू केलं आहे. इतकंच नाही तर सरदार सरोवरावर बांधण्यात येणाऱ्या धरणाची उंची वाढविण्यालाही विरोध कायम ठेवला आहे. आज या उपोषणाचा नववा दिवस आहे त्यामुळे मेधा पाटकर आणि इतर उपोषणकर्त्यांची प्रकृती चांगलीच खालावली आहे.

जिल्हा प्रशासनानं या सगळ्यांची प्रकृती तपासण्यासाठी डॉक्टरांचं एक पथक उपोषणाच्या ठिकाणी पाठवलं आहे. मेधा पाटकर आणि इतर सगळ्या कार्यकर्त्यांना रूग्णालयात दाखल करून त्यांच्यावर उपचार केले पाहिजेत असं मत डॉक्टरांनी नोंदवलं आहे मात्र मेधा पाटकर यांनी जोवर गावकऱ्यांना न्याय मिळत नाही तोवर रूग्णालयात दाखल होणार नाही आणि उपोषण मागेही घेणार नाही अशी आक्रमक भूमिका घेतली आहे. कोणतंही औषध घेण्यासही मेधा पाटकर आणि इतर कार्यकर्त्यांनी नकार दिला आहे. मेधा पाटकर आणि त्यांचे सहकारी गुजरातमधल्या धार जिल्ह्यात असलेल्या चिखल्दा गावात उपोषणासाठी बसले आहेत.

सर्वोच्च न्यायालयानं ३१ जुलै रोजीच आदेश दिले आहेत की धरणक्षेत्रात जी गावं आणि गावकरी यांच्या अडचणी वाढणार आहेत त्या सगळ्यांचं पुनर्वसन करा, त्यानंतर सरदार सरोवराची उंची वाढवा. मात्र कोणत्याही प्रकारचं पुनर्वसन न झाल्यानं किंवा त्याची तयारीही दिसून न आल्यानं मेधा पाटकर आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी २७ जुलैपासून उपोषण सुरू केलं आहे. आता त्यांची आणि इतर कार्यकर्त्यांची प्रकृती खालावली आहे अशात सरदार सरोवरावर बांधण्यात येणाऱ्या धरणाचं काय होणार हा प्रश्न कायम आहे.