पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सूचनेवरून प्रत्येक खासदाराचे मासिक प्रगतिपुस्तक तयार केले जाणार आहे. पक्षस्तरावरून संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या सदस्यांचा मासिक कार्य अहवाल बनवण्यात येईल, ज्यामध्ये अधिवेशनातील उपस्थिती, सभागृहात विचारलेले प्रश्न, चर्चेतील सहभाग आदी माहितीचा समावेश असेल. या माहितीच्या आधारावर संबंधित खासदाराचे प्रगतिपुस्तक तयार करण्यात येईल. प्रगतिपुस्तकामुळे भाजपच्या प्रत्येक खासदारावर काम करण्याचे सकारात्मक दडपण राहील, असा दावा पक्षसूत्रांनी केला. अधिवेशन नसताना विविध समित्यांमधील उपस्थिती, स्थानिक समस्या सोडविण्यासाठी घेतलेला पुढाकार आदी मुद्दय़ांचा विचार केला जाणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रगतिपुस्तकाची संकल्पना मांडली आहे. संसदेच्या दोन्ही सभागृहांत भाजपचे एकूण ३२० सदस्य आहेत, ज्यामध्ये १६० जण पहिल्यांदाच लोकसभेत निवडून आले आहेत. या खासदारांमधून भविष्यातील राष्ट्रीय स्तरावरचे नेते निवडण्याची मोदींची योजना आहे. मंत्रिमंडळ विस्तार, सभागृहात विविध विषयांवर चर्चेला सुरुवात करण्याची संधी या खासदारांना देण्यात येईल. पक्षस्तरावरून खासदारांच्या प्रगतिपुस्तकाची पडताळणी केली जाईल. पक्ष व सरकारमध्ये समन्वय साधण्यासाठी नरेंद्र मोदी व पक्षाध्यक्ष अमित शहा नियमितपणे चर्चा करीत आहेत. प्रगतिपुस्तकाचा निर्णयदेखील उभय नेत्यांच्या चर्चेनंतर घेण्यात आला. पक्षाने निश्चित केलेल्या नेत्यांनाच प्रसारमाध्यमांशी संवाद साधता येणार आहे. या नेत्यांना सप्ताहातून एकदा केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्याशी चर्चा करावी लागणार आहे. त्यामुळे पक्ष व सरकारचे धोरणात्मक निर्णय एकच राहतील. शिवाय समन्वय साधून दुहेरी भूमिका टाळता येईल, असा विश्वास अमित शहा यांच्या निकटवर्तीयांनी व्यक्त केला. भाजपला ऐतिहासिक विजय मिळवून दिल्यानंतर सरकार व पक्षात मोदीराज्य सुरू झाले आहे. नरेंद्र मोदी यांच्या आग्रहाखातर अमित शाह यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली. प्रवक्त्यांसह वृत्तवाहिन्यांवर चर्चेसाठी जाणाऱ्या नेत्यांनादेखील जेटली यांच्याशी आठवडय़ातून एकदा चर्चा करावी लागणार आहे. भाजपच्या प्रत्येक मंत्र्याला पक्ष मुख्यालयात आठवडय़ातून किमान तासभर बसण्याचे निर्देश यापूर्वीच अमित शाह यांनी दिले आहेत. खासदारांनाही प्रगतिपुस्तकामुळे संसदीय कामगिरीकडे विशेष लक्ष द्यावे लागणार आहे.