समाजवादी पक्षाचे ना निवडणूक चिन्ह ना नाव बदलणार असल्याचे पक्षाचे सुप्रिमो मुलायमसिंह यादव यांनी आपल्या समर्थकांसमोर ठणकावून सांगितले. या वेळी त्यांनी प्रथम इशाऱ्याने व नंतर थेट नाव घेत पक्षातील दुहीस रामगोपाल यादव यांनाच पुन्हा जबाबदार धरले. रामगोपाल यांना वेगळा पक्ष काढायचा असून त्यांनी चार वेळा दुसऱ्या पक्षाच्या अध्यक्षांची भेट घेतली असल्याचा आरोप केला. या वेळी मुलायमसिंह यांच्याबरोबर शिवपाल यादव हेही होते.

ते म्हणाले, पक्ष उभा करण्यासाठी मी खूप त्रास सहन केलेला आहे, लाठ्या खाल्या. मोठ्या संघर्षानंतर समाजवादी पक्ष बनला आहे. अखिलेश अडीच-तीन वर्षांचे असताना मी तुरूंगात गेलो होता. कार्यकर्त्यांनी त्रास सहन केला आहे. पक्षाच्या एकतेसाठी वेळा दिला. त्यासाठी आवश्यक ते सर्व पाऊल उचलले. कोण पक्षाला फोडण्यास निघाला आहे. त्याबाबत मला सर्व माहीत आहे. परंतु आम्हाला पक्षाची विभागणी नकोय, असे त्यांनी म्हटले.
मुलायम सिंह यांनी या वेळी रामगोपाल यादव यांच्यावर टीका केली. रामगोपाल आपला मुलगा-सूनेच्या म्हणण्यावरून पक्ष मोडीत काढण्यास निघाले आहेत. ते अखिल भारतीय समाजवादी पक्ष बनवण्यास निघाले आहेत. यासाठी त्यांनी मोटारसायकल हे चिन्ह मागितले आहे. त्यांनी चार वेळा भाजपच्या अध्यक्षांची भेट घेतली.
या वेळी मुलायम सिंह भावूक झाले, ते म्हणाले, जे माझ्याकडे होते. ते मी सर्व दिले आहे. आता माझ्याकडे तुम्ही लोकच आहात. आम्ही कोणत्याही परिस्थिती पक्ष फोडू देणार नाही. पक्षाच्या एकतेत कोणीही बाधा निर्माण करू नये. जनता आणि कार्यकर्ते पक्ष एकजूट ठेवतील. या वेळी त्यांनी सायकल हे चिन्ह आपल्याकडेच राहिल, असा आत्मविश्वास प्रकट केला.