गुरूभोवती फेऱ्या मारणाऱ्या अमेरिकी अंतराळ संशोधन संस्थेच्या (नासा) एका अंतराळयानात आणखी एक दोष उद्भवला आहे.

‘जुनो’ अंतराळयानाने हा दोष टिपल्यानंतर ते ‘सेफ मोड’मध्ये गेले आणि गुरू ग्रहाच्या दाट ढगांवरून जाण्याच्या काही तासांपूर्वी त्याने आपले कॅमेरे बंद केले, असे नासाने बुधवारी सांगितले. जुनोने त्याचा संगणक पुन्हा सुरू (रि-बूट) केला असून आता तो पृथ्वीशी संवाद साधू शकतो; मात्र अभियंत्यांनी नेमका दोष शोधून काढेपर्यंत त्याच्या हालचाली मर्यादित राहणार आहेत. या दोषाबाबत आत्ताच काही अंदाज करता येऊ शकत नाही. तीव्र किरणोत्सर्गी पट्टय़ांमुळे असे घडलेले नाही. कारण हे अंतराळयान ‘सेफ मोड’मध्ये गेले, त्यावेळी ते या ग्रहापासून बरेच दूर होते, असे सॅन अँटोनियो येथील साऊथवेस्ट रिसर्च इन्स्टिटय़ूट येथील मोहिमेचे प्रमुख शास्त्रज्ञ स्कॉट बोल्टन म्हणाले.