पंजाबच्या अमृतसर मतदारसंघातून विधानसभेवर निवडून आलेले काँग्रेसचे मंत्री नवज्योतसिंग सिद्धू शेतकऱ्यांच्या मदतीला धावले आहेत. पंजाबमध्ये शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीमध्ये खाक झालेल्या शेतीचे नुकसान भरुन काढण्यासाठी त्यांनी स्वत:च्या उत्पनातून शेतकऱ्यांना २४ लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. पंजाबमधील ओठीया परिसरात भीषण आगीने शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते.

शनिवारी रात्री शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या भीषण आगीमध्ये ३०० हेक्टर जमिनीतील पिकांचे नुकसान झाले. सरकारने शेतकऱ्यांना मदत जाहीर केल्यानंतर काँग्रेसचे मंत्री सिद्धूनीं स्वत:च्या खिशातून शेतकऱ्यांना मदत जाहीर केली. रविवारी सिद्धू यांनी आगीमध्ये नुकसान झालेल्या भागाची पाहणी केली. या पाहणीनंतर त्यांनी शेतकऱ्यांची भेट घेऊन त्यांना दिलासा दिला. तसेच त्यांचे नुकसान भरुन काढण्यासाठी त्यांनी शेतकऱ्यांसाठी २४ लाख रुपयांची मदत जाहीर केली. यापूर्वी आगीमध्ये झालेल्या नुकसान भरपाईसाठी पंजाब सरकारने शेतकऱ्यांना प्रति हेक्टर ८ हजार रुपये मदत जाहीर केली आहे.

सिद्धू यांच्या दौऱ्यावळी स्थानिक शेतकऱ्यांनी परिसरात आगीवर नियंत्रण मिळविण्याची अपुरी असुविधा असल्याची व्यथा मांडली. शेतकऱ्यांची ही समस्या ऐकून घेत सिद्धू यांनी अजनाला, राजासांसी, अमृतसर पूर्व आणि अमृतसरच्या उत्तरेकडील परिसरामध्ये वेगवेगळ्या अग्निशमन दलाच्या गाड्या देण्याचे आदेशही दिले.