पठाणकोट हल्ला वार्ताकन प्रकरण

पठाणकोट येथील हवाई दलाच्या तळावर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचे अतिप्रमाणात वार्ताकन करून देशाच्या सुरक्षेला धोका पोहोचवल्याप्रकरणी ‘एनडीटीव्ही हिंदी’ या वृत्तवाहिनीला एक दिवस प्रक्षेपण बंद ठेवण्याचे आदेश केंद्र सरकारतर्फे देण्यात आले आहेत. एखाद्या खासगी वाहिनीला अशा प्रकारचा आदेश दिला जाण्याची ही पहिलीच घटना आहे.

जानेवारी महिन्यात पठाणकोट येथे हवाई दलाच्या तळावर दहशतवादी हल्ला झाला होता. या हल्ल्याचे वार्ताकन करताना ‘एनडीटीव्ही हिंदी’ या वृत्तावाहिनीने हवाई तळावर मिग आणि लढाऊ विमाने, रॉकेट लाँचर्स, तोफगोळे, हेलिकॉप्टर्स आणि दारूगोळा याचा ठावठिकाणा सांगणारे तपशीलवार वार्ताकन केले होते. वृत्तवाहिनीचे हे वार्ताकन सामरिकदृष्टय़ा अत्यंत संवेदनशील होते. दहशतवादी वा दहशतवादी हल्ल्याचे संचालन करणाऱ्यांना या माहितीचा वापर करून हल्ल्याची तीव्रता वाढवता आली असती आणि त्यामुळे नागरिक व सुरक्षा दले यांच्या जीविताला धोका पोहचण्याची शक्यता निर्माण झाली असती, असा ठपका केंद्राच्या माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या मंत्रिसमितीने ठेवला आहे. याप्रकरणी संबंधित वृत्तवाहिनीला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती. सुरक्षेच्या दृष्टीने संवेदनशील असलेली संबंधित बहुतांश माहिती मुद्रित, इलेक्ट्रॉनिक आणि समाजमाध्यमे आदी माध्यमांमध्ये आधीपासूनच उपलब्ध होती, असे उत्तर एनडीटीव्ही वृत्तवाहिनीने नोटिशीला दिले होते. मात्र, मंत्रिसमितीने संबंधित वार्ताकनामुळे देशाच्या सुरक्षेला धोका निर्माण झाला असता, हे कारण देत वाहिनीला एक दिवस प्रक्षेपण बंद ठेवण्याचे आदेश दिले. ९ नोव्हेंबर रोजी वृत्तवाहिनीचे प्रक्षेपण दिवसभरासाठी बंद राहण्याची शक्यता आहे. यासंदर्भात वाहिनीची प्रतिक्रिया मात्र उपलब्ध होऊ शकली नाही.