बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांना एनडीएमध्ये येण्याचं रितसर आमंत्रणच भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी दिलं आहे. यानंतर राजदचे सर्वेसर्वा लालूप्रसाद यादव यांनी नितीशकुमार यांच्यावर टीकेचे ताशेरे झाडले आहेत. कालपर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांना नितीशकुमार शिव्या द्यायचे आता बघा त्यांच्यासमोरच कसे झुकले आहेत, अशी टीका लालूप्रसाद यादव यांनी केली आहे.

नितीशकुमार हे भाजपमध्ये गेल्यात जमा आहेत मला वाटत नाही की ते जदयू या आपल्या पक्षात राहतील अशी टीकाही लालूप्रसाद यादव यांनी ‘एएनआय’ या वृतसंस्थेशी बोलताना केली आहे.बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार आणि उपमुख्यमंत्री सुशीलकुमार मोदी यांचे हात नेमक्या कोणत्या आणि किती घोटाळ्यांमध्ये बरबटले आहेत हे लोकांपर्यंत पोहचविण्यासाठी आपण पत्रकार परिषद घेणार आहोत असंही लालूप्रसाद यादव यांनी म्हटलं आहे. कालपर्यंत देशाच्या राजकारणात ‘दो हंसो का जोडा’ म्हणून लालूप्रसाद यादव आणि नितीशकुमार यांची जोडी प्रसिद्ध होती. आता मात्र या दोघांचे संबंध कमालीचे विकोपाला गेले आहेत.

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची उमेदवारी जेव्हा एनडीएनं जाहीर केली होती तेव्हा नितीशकुमार यांनी रामनाथ कोविंद यांना पाठिंबा दिला होता, त्यानंतरच लालूप्रसाद यादव आणि नितीशकुमार यांच्यात वादाची पहिली ठिणगी पडली. त्यानंतर सीबीआयनं लालूप्रसाद यादव आणि त्यांच्या कुटुंबियांच्या मालमत्तेवर छापेमारी केली, ज्यानंतर बिहारमध्ये राजकीय महाभारतच बघायला मिळालं.

भ्रष्टाचाराचे आरोप होऊनही तेजस्वी यादव यांनी उपमुख्यमंत्रीपद सोडणार नाही असं म्हणत नितीशकुमार यांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला. मात्र नितीशकुमारांनी राजदसोबत काडीमोड घेत आणि महाआघाडीची साथ सोडत मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला, तसंच भाजपसोबत हातमिळवणी करत पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले.

नितीशकुमारांनी खेळलेली ही खेळी राजदसाठी अत्यंत अनपेक्षित होती. त्याचमुळे आता राजदचे सर्वेसर्वा नितीशकुमारांवर टीकेची एकही संधी सोडताना दिसत नाहीयेत. कालपर्यंत गळ्यात गळे घालून फिरणारे लालूप्रसाद यादव आणि नितीशकुमार आज एकमेकांचे पक्के वैरी झाले आहेत.