भ्रमक ऑनलाईन जाहिरातींवर अंकुश ठेवण्यासाठी चीनने याबाबतचे नियम आणखी कडक केले असून, यामुळे ऑनलाईन जाहिरातींवर नियंत्रण मिळण्यास मदत होणार असल्याचे सूत्रांनी माहिती देताना सांगितले.

हे सर्व तात्पुरते नियम आजपासून लागू करण्यात येणार आहेत. हे नियम सर्व ऑनलाईन जाहिरातींसाठी लागू करण्यात होणार आहेत. ऑनलाईन जाहिरातींचे प्रमाण चीनमध्ये मोठय़ा प्रमाणावर वाढले होते. त्यावर अंकुश ठेवण्याची मागणी सामान्य नागरिकांमधून करण्यात येत होती. एका बनावट वेबसाइटवरील चुकीची माहिती घेतल्यामुळे बीजिंग येथील एका तरुणाचा मृत्यू झाला होता. त्याने बनावट वेबसाइटवरून चुकीचे वैद्यकीय उपचार केले होते.

 

तहसीलदाराला लाच घेताना रंगेहाथ अटक

हैदराबाद : तेलंगणमधील मेडक जिल्ह्य़ात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) अधिकाऱ्यांनी एका महसूल अधिकाऱ्याला दोन लाख रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पडकले.

दौलताबाद परिमंडळाचे तहसीलदार पी. रवींद्र रेड्डी हे तक्रारदाराकडून दोन लाख रुपयांची लाच स्वीकारत असताना एसीबीच्या अधिकाऱ्यांनी सोमवारी रात्री त्यांना कार्यालयातच रंगेहाथ पकडले. जमीन हस्तांतरणासंदर्भातील फायलीबाबत प्रक्रिया सुरू करून ती फाईल महसूल विकास अधिकाऱ्यांकडे पाठविण्यासाठी पी. रवींद्र रेड्डी यांनी तक्रारदाराकडे लाच मागितली होती.