पाकिस्तानात पुन्हा लष्करी राजवट येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. देशातील राजकीय संघर्ष टाळायचा झाल्यास पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी सत्तेतून पायउतार व्हावे, असा सल्ला लष्करप्रमुख जनरल राहील शरीफ यांनी दिल्याचे वृत्त ‘दुनिया टीव्ही’ सोमवारी प्रसारित केल्याने राजकारणाने नवे वळण घेतले आहे. दरम्यान, ‘टीव्ही’वर प्रसारित केलेले वृत्त पूर्णत: निराधार असल्याचे सांगत शरीफ सरकार आणि लष्करी प्रवक्त्यांनी ते साफ फेटाळून लावले.
शरीफ विरोधकांनी माघारीची शक्यता फेटाळून लावली आहे. त्यामुळे राजधानीतील संघर्षांची स्थिती कायम आहे. जर यावर तोडगा काढायचा झाल्यास शरीफ यांनी हंगामी तत्त्वावर तीन महिन्यांसाठी राजीनामा द्यावा. या काळात त्यांच्यावरील भ्रष्टाचारांच्या आरोपांची चौकशी केली जाईल, त्यामुळे सध्याच्या राजकीय कोंडीवर योग्य तोडगा असल्याचे लष्करप्रमुखांनी सुचविल्याचे ‘दुनिया टीव्ही’ने वृत्तात पुढे म्हटले आहे.
 दरम्यान, ‘पाकिस्तान मुस्लिम लीग’च्या एका वरिष्ठ नेत्यानेही या वृत्ताचा इन्कार केला. पंतप्रधान नवाझ शरीफ आणि जनरल राहील शरीफ यांच्यात देशातील कायदा आणि सुव्यवस्था यावर चर्चा झाली. दोघांनी बैठकीत देशातील राजकीय परिस्थितीचा आढावा घेतला. पाकिस्तानी राज्यघटनेच्या विरोधात कोणताही निर्णय घेतला जाणार नाही, याची हमी शरीफ यांनी दिल्याचे या नेत्याने पुढे स्पष्ट केले.
चौकशीला सामोरे जा!
‘दुनिया टीव्ही’ने वृत्तात म्हटल्याप्रमाणे लष्करप्रमुख जनरल राहील शरीफ यांनी नवाझ शरीफ यांची स्वतंत्र आयोगाच्या वतीने चौकशी व्हावी. विरोधक यावर आंदोलन मागे घेण्यास तयार होतील, अशी सूचना बैठकीत केली. २०१३ मध्ये पाकिस्तानात झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत गैरप्रकार झाल्याचा, तसेच भ्रष्टाचाराचा आरोप विरोधकांनी शरीफ यांच्यावर केला आहे. याचा हवालाही त्यांनी या वेळी दिला.
तसे काही घडलेच नाही..
लष्कराचे प्रवक्ते मेजर जनरल असीम बावजा यांनी राजीनाम्याच्या वृत्ताचा ‘ट्विटर’ वर इन्कार केला.

माझ्या वडिलांविषयी पसरवलेले वृत्त चुकीच्या माहितीवर आधारित आहे. त्यांच्याविरोधात ज्या आवया उठत आहेत, त्या निराधार असून ते पंतप्रधानपदी कायम आहेत.
    – मरियम नवाझ शरीफ,  नवाझ शरीफ यांची मुलगी