फाशीची शिक्षा ठोठाविण्यात आलेल्या ५०० दहशतवाद्यांपैकी ५५ जणांना फासावर लटकविण्याची तयारी पाकिस्तानने सुरू केली आहे. फाशीवर २००८ मध्ये घालण्यात आलेले र्निबध उठविण्यात आल्यानंतर या दहशतवाद्यांचे दयेचे अर्ज फेटाळण्यात आले असल्याने त्यांना फाशी देण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे.
पाकिस्तानचे अध्यक्ष मामनून हुसेन यांनी ५५ दहशतवाद्यांनी केलेल्या दयेच्या याचिका फेटाळून लावल्या असल्याने त्यांना फासावर लटकविण्याचा मार्ग मोकळा झाला असल्याचे अंतर्गत व्यवहार मंत्रालयाच्या अधिकाऱ्याने सांगितले. फाशीवर घालण्यात आलेल्या र्निबधांमुळे २०१२ पासून दयेचे अनेक अर्ज प्रलंबित आहेत. माजी अध्यक्ष झरदारी यांनी त्यावर कोणताही निर्णय घेण्यास नकार दिला होता.
पेशावरमधील एका शाळेवर तालिबान्यांनी केलेल्या हल्ल्यात बहुसंख्य लहान मुलांसह १४८ जण ठार झाल्यानंतर फाशीच्या शिक्षेवरील र्निबध सरकारने उठविले आहेत. त्यामुळे न्यायालयाने ज्या ५०० जणांना फाशीची शिक्षा ठोठावली आहे, त्यांना फासावर लटकविण्याचा मार्ग मोकळा झाला आहे, असे अंतर्गत व्यवहारमंत्री निसार अली खान यांनी सांगितले.
पाकिस्तानचे माजी लष्करशहा परवेझ मुशर्रफ यांच्यावर ११ वर्षांपूर्वी हल्ला करणाऱ्या चार दहशतवाद्यांना फाशीची शिक्षा ठोठाविण्यात आली होती. या चार दहशतवाद्यांना रविवारी फासावर लटकविण्यात आले.