धर्माच्या नावाखाली जगभरात सुरू असलेल्या नृशंस घटना, हत्याकांडे, अपहरणाच्या घटना आणि बालविरोधी हिंसाचार यांना पूर्णविराम द्या, असे आवाहन ख्रिश्चनांचे धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांनी केले. नाताळनिमित्त पोप यांनी आपल्या वार्षिक ‘अर्बी एट् ओर्बी’ संदेशाद्वारे ख्रिस्ती धर्मीयांना शुभेच्छा दिल्या. मात्र त्याच वेळी यंदा हिंसाचाराच्या घटनांमुळे नाताळवर शोककळा पसरल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली.
मध्य पूर्व, नायजेरिया, युक्रेन आणि लिबिया या देशांमधील हिंसाचाराच्या घटनांचा आणि पाकिस्तानात गेल्याच आठवडय़ात झालेल्या शाळकरी विद्यार्थ्यांवरील हल्ल्याचा पोप यांनी निषेध केला. तसेच इबोला या संसर्गजन्य रोगाने मृत्युमुखी पडलेल्यांना त्यांनी श्रद्धांजली अर्पण केली. यंदा नाताळच्या पवित्र दिवशी अश्रूंचा महापूरच पाहावा लागत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
आजही अनेक बालके हिंसाचाराचा तसेच मानवी तस्करीचा बळी ठरत आहेत हे दु:खद आहे. पाकिस्तानातील लष्करी शाळेत घडलेले हत्याकांड तर वेदनादायी आहे, त्या मुलांच्या पालकांना सहानुभूतीची गरज आहे, असे पोप म्हणाले. युक्रेनमध्ये परस्परांविषयी तिरस्काराची भावना दिसते. मात्र या भावनेवर मात करून बंधुत्वाच्या दिशेने प्रवास करण्याची खरी गरज आहे, असे आवाहन त्यांनी युक्रेनवासीयांना केले. इराक, सीरिया येथे सुरू असलेल्या संघर्षांतील पीडितांविषयी आपल्या अंत:करणात करुणेची भावना असल्याचे तसेच या वांशिक संघर्षांना लवकरच पूर्णविराम लागो असे आवाहन त्यांनी केले.
अर्बी एट् ओर्बी
अर्बी हा शब्द अर्ब अर्थात शहर या शब्दाचा अपभ्रंश होऊन आला आहे. तर ओर्बी हा शब्द ऑर्बिट या शब्दावरून आला आहे. अर्बी म्हणजे शहर, तर येथे अर्थ रोम शहर. तर ओर्बी म्हणजे पृथ्वी. ‘रोमवासीय आणि जगभरातील बांधवांसाठी’ दिला जाणारा शुभेच्छा संदेश म्हणजेच अर्बी एट् ओर्बी.