दिल्लीतील कारभाराचा पुरता बोजवारा उडाला आहे, अशी तक्रार भाजपचे खासदार डॉ. सुब्रह्मण्यम स्वामी यांनी केली असून ती राष्ट्रपती सचिवालयाने गृहमंत्रालयाकडे वर्ग केली आहे.
राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांना गेल्या आठवडय़ात पाठविण्यात आलेल्या पत्रात डॉ. स्वामी यांनी म्हटले आहे की, आप सरकार अव्यवहार्य कारभार करीत असल्याने राष्ट्रपतींनी हस्तक्षेप करावा, अशी मागणी या पत्राद्वारे करण्यात आली आहे.
काँग्रेस पक्षाच्या हुकुमावरून दिल्लीचे नायब राज्यपाल नजीब जंग हे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सहकार्य करून खोडसाळपणाची भूमिका घेत आहेत, असा आरोपही डॉ. स्वामी यांनी केला आहे. इतकेच नव्हे तर जाहीरपणे जंग आपच्या विरोधात असल्याचे भासवीत आहेत, असेही त्यांनी म्हटले आहे.
आपले पत्र गृहसचिवांकडे वर्ग करण्यात आल्याचे राष्ट्रपतींच्या सचिवालयातून डॉ. स्वामी यांना कळविण्यात आले आहे. रिझव्‍‌र्ह बँकेचे गव्‍‌र्हनर रघुराम राजन यांच्यावर टीका करून त्यांना पदत्याग करण्यास भाग पाडणाऱ्या स्वामी यांनी आता अरविंद केजरीवाल यांचा क्रमांक असल्याचे म्हटले होते. स्वामी यांनी गेल्या काही दिवसांत अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या खात्याशी संबंधीत मंत्र्यांवर टीका केली आहे. त्यामुळे पंतप्रधानांनीही स्वांमींवर नाराजी व्यक्त केली.