हैदराबाद मध्यवर्ती विद्यापीठाचे कुलगुरू आप्पा राव पोडिले यांनी राजीनामा द्यावा अथवा त्यांची हकालपट्टी करण्यात यावी, अशा आशयाचा ठराव विद्यापीठातील विद्यार्थी संघटनेने केला आहे. विद्यापीठाची सर्वसाधारण सभा मंगळवारी आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ९४९ विद्यार्थी हजर होते, त्यावेळ सहा ठराव मंजूर करण्यात आले. रोहित वेमुला या दलित विद्यार्थ्यांला श्रद्धांजली वाहण्याचा ठरावही करण्यात आला.
विद्यार्थी संघटना ही विद्यापीठातील निर्णय घेणारी सर्वोच्च संस्था असल्याचा दावा विद्यार्थ्यांनी केला आहे. वेमुलाच्या आत्महत्येनंतर संकुलात घडलेल्या घडामोडींची माहिती विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष झुहैल के. पी. याने विद्यार्थ्यांना दिली. या वेळी हजर असलेल्या सर्व विद्यार्थ्यांची मते जाणून घेण्यात आली.
या बैठकीत आप्पा राव पोडिले यांनी राजीनामा द्यावा अथवा त्यांची हकालपट्टी करण्यात यावी, असा ठराव करण्यात आला. बैठकीला हजर असलेल्या ९४८ विद्यार्थ्यांनी ठरावाच्या बाजूने मतदान केले, केवळ एकाच विद्यार्थ्यांने त्याला हरकत घेतली, असे सांगण्यात आले.