जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री मुफ्ती मोहम्मद सईद यांच्या घरावर मंगळवारी काही फुटीरतावाद्यांनी पाकिस्तानचा झेंडा लावल्याने मोठी खळबळ उडाली. दक्षिण काश्मीरमधील बिजबेहरा भागात सईद यांचे हे वडिलोपार्जित घर आहे. याच परिसरात घर असणारे हिजबुल मुजाहिदीनचे तीन दहशतवादी सोमवारी लष्करी चकमकीत मारले गेले होते. यापैकी एका दहशतवाद्यांची मंगळवारी अंत्ययात्रा काढण्यात आली होती. त्यावेळी काही निदर्शकांनी मुख्यमंत्र्यांच्या घरावर दगडफेक केली. प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, यापैकी काही युवकांनी मुख्यमंत्र्यांच्या घरावर पाकिस्तानचा मोठा झेंडा फडकावला. दरम्यान, या घटनेमुळे सध्या दक्षिण काश्मीरमध्ये तणावाचे वातावरण असून बंद पाळण्यात आला आहे. हुरियतचे अध्यक्ष सयद अली शहा गिलानी यांनी तीन दहशतवाद्यांना मारल्याप्रकरणी काश्मीरमध्ये एकदिवसीय संपाची हाक दिली होती. त्यामुळे काश्मीर खोऱ्यातील बहुतेक दुकाने बंद होती.