रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी जंगलात सोडलेला सैबेरियन जातीच्या दुर्मीळ वाघांचे चीनच्या ईशान्येकडील हेलाँगजियांग प्रांतातील एका शेतात घुसून १५ शेळ्या फस्त केल्या. ‘युस्तीन’ असे या वाघाचे नाव असून रविवार आणि सोमवारी असे दोन दिवस फुयॉन येथील शेतात घुसून त्यांने या शेळ्यांवर ताव मारल्याचे वृत्त चीनमधील ‘क्षिन्हुआ’ या सरकारी संस्थेने दिले आहे.
‘युस्तीन’च्या पावलांच्या खुणा (पगमार्क्स) आणि इतर पुरावे आम्हाला आढळले आहेत, अशी माहिती ईशान्य वन विद्यापीठातील वन्यजीव तज्ज्ञ झु शीबिंग यांनी बुधवारी दिली. गेल्या मे महिन्यात अमूर प्रांतातील जंगलात पुतीन यांनी सोडलेल्या तीन सायबेरियन वाघांपैकी ‘युस्तीन’ हा एक वाघ आहे. सध्या चीनमध्ये त्यातील दोन वाघ ‘शिरले’ आहेत. चीन वन्यजीव कर्मचारी या वाघांवर बारीक लक्ष ठेवून आहेत. वाघांच्या पायांना ‘रेडिओ टॅग’ लावण्यात आला आहे.
प्रत्येक शेळीच्या डोक्याला माणसाच्या बोटाच्या आकाराचे छिद्र पडले आहे. शेळ्यांचा मानेपासूनचा भाग वाघांनी फोडून खाल्ला आहे. यावरून त्यांच्या जबडय़ाची ताकद समजून येते, असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
यातील दुसरा वाघ ‘कुझ्या’ हा ‘युस्तीन’पेक्षाही चपळ निघाला आहे. त्याने गेल्या महिन्यात याच प्रांतातील एका गावात शिरून पाच कोंबडय़ांची ‘पार्टी’ साजरी केली होती.
यावरही चीनच्या वनरक्षक आणि अधिकारी विशेष लक्ष ठेवून होते.
काळ सोकावतोय..
चीनमध्ये रशियाकडून सोडलेल्या सैबेरियन वाघांची जोरदार चर्चा सुरू आहे. चीनला घुसखोरी अजिबात मान्य नाही. आंतरराष्ट्रीय पातळीवरही शेजारील राष्ट्रांशी चीनचे सीमावाद आहेत. यावरून चीन हा नेहमीच आक्रमक राहिला आहे. मात्र या वन्यप्राण्यांच्या घुसखोरीला चीनने वेगळ्या पद्धतीने उत्तर द्यायेच ठरवल्याचे दिसते. कारण सैबेरियन हा वाघ दुर्मिळ समजला जातो आणि त्याचे जतन कोणतीही किंमत मोजून करणे आवश्यक आहे. सध्या चीनचे वन्यजीव खाते त्यासाठी झटत आहे. या वाघांना त्यांचे खाद्य शिकार करून कसे खाता येईल, याकडे जास्त लक्ष दिले जाईल, असे सूत्रांनी सांगितले.