केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी शनिवारी आसामचे मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल यांच्यासह मोरीगाव जिल्ह्य़ाचा दौरा केला आणि राज्य सरकारला केंद्राकडून सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. आसाममधील पुरात आतापर्यंत २५ जणांचे बळी गेले असून राज्यातील २२ जिल्ह्य़ांमधील ३३०० गावांतील १९ लाख जण बाधित झाले आहेत.

राजनाथ सिंह यांनी जागी भक्तगाव येथील पूर मदत छावणीला भेट दिली आणि बाधितांकडे मदत सुपूर्द केली, इतकेच नव्हे तर पुरात जे मरण पावले त्यांच्या नातेवाईकांना सानुग्रह अनुदानही दिले. राज्यातील पूरस्थिती गंभीर असून केंद्र सरकार राज्याला सर्वतोपरी सहकार्य करील, असे गृहमंत्री म्हणाले. पुरामुळे जे नुकसान झाले आहे त्याची पाहणी करून सरकार त्यांना भरीव मदत करील, असेही ते म्हणाले.

 

किशनगंज येथे दोन अल्पवयीन मुली नदीत बुडाल्या

किशनगंज : किशनगंज जिल्ह्य़ातील जमिनीगुडी गावातील बुरहीदांगी नदीत बुडून दोन अल्पवयीन बहिणी मरण पावल्याची घटना घडली आहे. चारा आणण्यासाठी दोन्ही बहिणी नदी ओलांडून पलीकडे जात असताना पुराच्या पाण्यात त्या वाहून गेल्या, असे उपविभागीय अधिकाऱ्यांनी सांगितले. राफिया (१०) आणि शर्मिन (१२) अशी या बहिणींची नावे आहेत.

एनडीआरएफ कर्मचाऱ्यांच्या मदतीने दोन्ही मुलींचे मृतदेह नदीतून बाहेर काढण्यात आले आहेत. मुसळधार पावसामुळे नदी तुडुंब भरली होती आणि पाण्याची पातळी सातत्याने वाढत चालली होती, असे स्थानिकाने सांगितले.