नोटाबंदीच्या निर्णयाला जवळ-जवळ एक महिना पूर्ण होत आला तरी सुट्यांचा प्रश्न अद्याप सुटता सुटेनासा झाला आहे. बाजारामध्ये २००० ची मोड मिळवता मिळवता नाकी नऊ आले आहेत. तेव्हा आरबीआयने १०० च्या नोटा काढण्याचा निर्णय घेतला आहे. जुन्या नोटादेखील चालू असणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

भारतीय रिझर्व्ह बॅंकेनी १०० च्या नव्या नोटा बाजारात आणण्याचे ठरवले आहे. या नव्या नोटांच्या नंबर पॅनेलमध्ये इनसेट लेटर असणार नाही.

या नोटा आल्यानंतर बाजारातील सुट्यांचा प्रश्न कमी होईल अशी अपेक्षा बाळगली जात आहे.
याआधी आरबीआयने ५० आणि २० च्या नोटा काढण्याचा निर्णय घेतला होता. रोख पैशांच्या कमतरतेमुळे भाजीविक्रेते, छोटे व्यापारी इत्यादी लोकांना खूप मोठे नुकसान सहन करावे लागत आहे. तेव्हा २०, ५० आणि १०० च्या नोटांनी बाजारपेठेला दिलासा मिळेल असा अंदाज वर्तविण्यात येत आहे.

मागील महिन्यात ८ नोव्हेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदीचा निर्णय जाहीर केला. ५०० आणि १००० च्या नोटा चलनातून रातोरात बंद झाल्या. त्यानंतर नोटांचा तुटवडा पडण्यास सुरुवात झाली.
नोटांचा तुटवडा कमी व्हावा म्हणून गेल्या काही दिवसात भारतीय रिजर्व्ह बॅंकेनी वेळोवेळी पावले उचलली असे असले तरी बॅंका आणि एटीएम समोरील गर्दी कमी होण्याचे नाव घेत नव्हती.

नोटाबंदीमुळे सर्वाधिक मोठा फटका सेवा क्षेत्राला बसल्याचे एका प्रतिष्ठित संशोधन संस्थेनी देखील सांगितले. भारतामध्ये सेवाक्षेत्राचा जीडीपीमधील वाटा ६० टक्के आहे. तेव्हा या क्षेत्राला बसलेला फटका मोठा आहे. या निर्णयामुळे आर्थिक वृद्धीमध्ये देखील घसरण होणार असल्याचे दिसत आहे.

सरकारने ५०० आणि १००० च्या नोटा बंद करुन सुरुवातीला ५०० आणि २००० च्या नोटा आणल्यामुळे सुट्यांचा प्रश्न निर्माण झाला. महिना झाला तरी अद्याप ही स्थिती न सुधारल्यामुळे १०० च्या नोटा आणण्याचा निर्णय आरबीआयने घेतला आहे.