आगामी लोकसभा निवडणुकीनंतर केंद्रात सत्ता स्थापन करण्यासाठी प्रादेशिक पक्षांना महत्त्वाची भूमिका पार पाडावी लागेल, असे भाकीत संयुक्त जनता दलाचे अध्यक्ष शरद यादव यांनी सोमवारी व्यक्त केले.
आवामी नॅशनल कॉन्फरन्सच्या अध्यक्षा खालिदा शाह यांची यादव यांनी श्रीनगरमध्ये भेट घेतली. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी हे भाकीत केले. ते म्हणाले, येत्या लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेस पक्षाच्या जागांची संख्या घटण्याची शक्यता असून, भारतीय जनता पक्षाच्या जागांमध्ये लक्षणीय वाढ होण्याची शक्यता नाही. त्यामुळेच निवडणुकीनंतर सत्ता स्थापन करताना प्रादेशिक पक्षांना महत्त्वाची भूमिका पार पाडावी लागेल. जम्मू-काश्मीरमधील प्रादेशिक पक्षांसोबत आम्ही याआधी काम केले आहे. त्यामुळे आमच्यापुढे सर्व पर्याय खुले आहेत, असेही यादव यांनी स्पष्ट केले.
जम्मू-काश्मीर राज्याला विशेष राज्याचा दर्जा देणारे राज्यघटनेतील कलम ३७० पुढील काळातही कायम राहिले पाहिजे, अशीही अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.