पाकिस्ताननने २४ तासांच्या आत पुन्हा एकदा नियंत्रण रेषेवर नौगाम, केरन आणि राजौरी सेक्टरमध्ये शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे. शुक्रवारी रात्री राजौरीतील सुंदरबनी येथे झालेल्या भीषण गोळीबारात रायफलमॅन जयद्रथ सिंह शहीद झाले असून एक जवान जखमी असल्याचे समजते. भारतीय लष्कराकडूनही पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर देण्यात आले. यामध्ये पाकिस्तानचे मोठे नुकसान झाल्याचे वृत्त आहे.

लष्करी अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानी सैनिकांनी पुन्हा एकदा नौगाम सेक्टरमधील आमच्या चौकींवर नाहक गोळीबार करत शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. त्यांनी कुपवाडातील केरन सेक्टरमध्येही शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. नौगाम सेक्टरमध्ये २४ तासाच्या आत पाकिस्तानने तिसऱ्यांदा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. सांयकाळी ६ वाजता सुंदरबनी येथेही गोळीबार करण्यात आला.

बुधवारी नौगाम सेक्टरमध्ये पाकिस्तानने केलेल्या गोळीबारात एक जवान शहीद झाला होता. पाकिस्तानने उत्तर काश्मीरमध्ये मागील ९ दिवसांत ६ वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे.