हरियाणाचे तत्कालीन मुख्यमंत्री भूपिंदर हुड्डा यांनी जमीन व्यवहार करताना कायद्याचे पालन केले नाही असा निष्कर्ष भाजप सरकारने नेमलेल्या समितीने काढला आहे. समितीने चौकशी केलेल्या जमीन व्यवहारांमध्ये डीएलएफ आणि सोनिया गांधी यांचे जावई रॉबर्ट वढेरा यांच्या कंपनीच्या व्यवहाराचाही समावेश आहे.
हरियाणात भूपिंदर हुड्डा यांच्या कार्यकाळात मोठ्या प्रमाणात भूखंड वाटपात गैरव्यवहार झाल्याचा आरोप केला जात होता. या आरोपांची चौकशी करण्यासाठी भाजप सरकारने दिल्ली हायकोर्टाचे माजी न्यायाधीश एस एन धिंग्रा यांना नेमले होते. हुड्डा यांच्या कार्यकाळात भूखंडाचे वाटप झालेल्या २५० प्रकरणांची धिंग्रा यांच्या मार्फत चौकशी करण्यात आली. धिंग्रा यांच्या चौकशीत हुड्डा यांनी नियमबाह्य भूमिका घेतल्याचे आढळले आहे. धिंग्रा यांनी सरकारी अधिकारी आणि गैरसरकारी व्यक्तींवर कारवाईची शिफारस केली आहे. या गैरसरकारी व्यक्तींनी व्यवहारात महत्त्वाची भूमिका बजावली होती. मात्र ही व्यक्ती कोण होती हे मात्र समजू शकलेले नाही.
बुधवारी धिंग्रा यांनी हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांच्याकडे अहवाल सुपूर्त केला आहे. सरकारी असो किंवा गैरसरकारी जी लोकं या गैरव्यवहारात सहभागी होती त्यांना मी जबाबदार ठरवले आहे असे धिंग्रा यांनी पत्रकार परिषद सांगितले. मात्र या अहवालातील तपशील उघड करण्यास त्यांनी स्पष्ट नकार दिला आहे. जर या भूखंड व्यवहारात गैरव्यवहार झाला नसता तर मी १८२ अहवाल कसा तयार केला असता असा सवाल उपस्थित करत घोटाळा झालाच नाही असा दावा करणा-यांना धिंग्रा यांनी फटकारले आहे.