श्वानप्रेमींसाठी एक वेगळी बातमी म्हणजे ब्रिटनमध्ये असलेला ३१२ ग्रॅम वजनाचा व चार इंच उंचीचा कुत्रा सर्वात लहान कुत्रा ठरला आहे.
टायसन असे त्याचे नाव असून तो ल्हासा-ची या प्रजातीचा आहे. ल्हासा आप्सो व चिचुहुआ या प्रजातींचा संकर करून ही प्रजाती तयार केली आहे. त्याचा जन्म या वर्षी सुरुवातीला झाला. या छोटय़ाशा पिटुकल्याला त्याच्या भावंडांनी नाकारले होते पण मालक रोझमेरी मॅकलिंडेन यांनी त्याला हाताने अन्न भरवले त्यासाठी त्यांनी दोन पिपेटचा वापर केला. पिपेट म्हणजे रसायनशास्त्राच्या प्रयोगशाळेत वापरल्या जाणाऱ्या काचेच्या नळ्या आहेत.
त्याचे मालक असलेल्या मॅकलिंडेन व त्यांचे पती अँटनी कोर ह लिंकनशायर येथे वास्तव्यास आहेत. या कुत्र्याचे वजन घटू लागले तेव्हा ते दोघे काळजीत पडले होते. या जोडप्याने लगेच टायसनला प्राण्यांच्या डॉक्टरांकडे नेले व त्याच्यात त्यांना काहीच विपरीत दिसून आले नाही. त्यांनी या जोडप्यास टायसनला अन्न भरवण्याबाबत काही सूचना दिल्या असे एक्सप्रेस डॉट को डॉट युके या संकेतस्थळाने म्हटले आहे. टायसन आता तंदुरुस्त आहे.