जम्मू काश्मीरमधील श्रीनगर येथील लाल चौक परिसरात असलेल्या तीन शैक्षणिक संस्थांमधील विद्यार्थ्यांनी आंदोलन केले. एसपी महाविद्यालय, महिला शासकीय महाविद्यालय आणि एस पी उच्च माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी मौलाना आझाद रोडवर आंदोलन केल्याची माहिती पोलिसांनी दिली. या विद्यार्थ्यांनी उपस्थित असलेल्या सुरक्षा दलातील जवानांशी बाचाबाचीदेखील झाली. यानंतर विद्यार्थ्यांनी सुरक्षा दलाच्या जवानांवर जोरदार दगडफेक केली.

श्रीनगरमध्ये सोमवारी मोठ्या प्रमाणात विद्यार्थी रस्त्यावर उतरले होते. जवानांशी बाचाबाची करणाऱ्या सहा विद्यार्थ्यांना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिली. या आंदोलनात विद्यार्थिनींचादेखील मोठा सहभाग होता. रस्त्यावर उतरलेल्या विद्यार्थ्यांनी ‘आझादी’च्या घोषणा दिल्याची माहितीदेखील पोलिसांनी दिली. आंदोलनादरम्यान दगडफेक करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या दिशेने सुरक्षा दलाकडून अश्रूधूर सोडण्यात आला. त्यामुळे शहराच्या मध्यभागात गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. यामध्ये बसित झरगर, हबीब नकाश आणि दानिश इस्माईल हे तीन छायाचित्रकार एसपी शाळेजवळ जखमी झाले.

काश्मीर खोऱ्यातील महाविद्यालये जवळपास आठवडाभर बंद होती. १५ एप्रिलला झालेल्या आंदोलनानंतर पुलवामातील शासकीय महाविद्यालयावर कारवाई करण्यात आल्यानंतर काश्मीर खोऱ्यातील महाविद्यालये आठवडाभर बंद ठेवण्यात आली होती. आज (सोमवारी) काश्मीर खोऱ्यातील महाविद्यालये सुरु झाली. मात्र पुन्हा एकदा विद्यार्थ्यांनी आंदोलन करत दगडफेक केल्याने परिसरात तणाव निर्माण झाला आहे.

१५ एप्रिल रोजी पुलवामातील महाविद्यालय परिसरात विद्यार्थ्यांनी आंदोलन करत घोषणाबाजी केली. या आंदोलनादरम्यान काही विद्यार्थी सुरक्षा दलाच्या जवानांना भिडले. त्यामुळे जमावाला पांगवण्यासाठी जवानांकडून अश्रूधुराचा वापर करण्यात आला. यानंतर निर्माण झालेल्या गोंधळात पन्नासहून अधिक विद्यार्थी जखमी झाले. सुरक्षा दलाचे मनमानी करत असल्याचा आरोप करत विद्यार्थ्यांकडून १५ एप्रिलला आंदोलन करण्यात आले होते.