भारताचा एकदिवसीय क्रिकेट संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी याने एका जाहिरातीत कथितरीत्या स्वत:ला भगवान विष्णूचा अवतार दाखवल्याबद्दल त्याच्याविरुद्ध आंध्र प्रदेशातील एका न्यायालयात प्रलंबित असलेल्या फौजदारी कारवाईला सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी स्थगिती दिली.
हा फौजदारी खटला आंध्र प्रदेशातील अनंतपूरच्या न्यायालयातून कर्नाटकातील बेंगळुरू येथे वर्ग केला जावा, यासाठी धोनीने केलेल्या याचिकेबाबत आपले म्हणणे मांडावे, अशी नोटीसही न्या. दीपक मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने प्रतिवादी येरागुंटला श्यामसुंदर यांच्या नावे जारी केली. एका उद्योग नियतकालिकाच्या मुखपृष्ठावर भगवान विष्णूच्या रूपात दिसणाऱ्या धोनीने हाती एका बुटासह अनेक वस्तू धारण केल्यामुळे देवतेचा अपमान झाला असल्याचा आरोप या तक्रारीत करण्यात आला आहे.
धोनीविरुद्ध न्यायदंडाधिकाऱ्यांच्या न्यायालयात फौजदारी तक्रार दाखल केलेले श्यामसुंदर, तसेच राज्य पोलिसांनी धोनी यांच्या याचिकेवर आठ आठवडय़ात आपले म्हणणे सादर करावे, असे सांगून सर्वोच्च न्यायालयाने धोनीविरुद्ध सुरू असलेल्या फौजदारी कारवाईला स्थगिती दिली.