गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच आरोप-प्रत्यारोपांच्या राजकारणाने जोर धरला आहे. भाजपमध्ये सहभागी होण्यासाठी पाटीदार नेते नरेंद्र पटेल यांनी लाच दिल्याचा आरोप केल्यानंतर काँग्रेसनेही भाजपविरोधात आघाडी उघडली आहे. काँग्रेसचे प्रवक्ते मनीष तिवारी यांनी सोमवारी पत्रकार परिषद घेत भाजप, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्यावर टीका केली. पंतप्रधान गुजरातचे मुख्यमंत्री असल्यासारखे वागत असल्याचा आरोप करत उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांमार्फत लाचखोरीची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली. दुसरीकडे काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधींनीही लाचखोरीप्रकरणी भाजपवर निशाणा साधला. गुजरात अमूल्य असून त्यांना कोणी खरेदी करू शकत नाही, असे ट्विट त्यांनी केले.

पराभवाच्या भीतीने भाजप असे करत असल्याचे सांगत, गुजरातच्या जनतेने भाजपविरोधात विद्रोह केला आहे. निवडणूक आयोगाने त्वरीत निवडणुकीची घोषणा करावी व आचारसंहिता लागू करावी. निवडणूक आयोगाने दिवाळीच्या सुटीवरून परत येण्याची वेळ आली आहे. निवडणूक आयोगही या कटात का सहभागी आहे हेच समजत नसल्याचे तिवारी म्हणाले.

गुजरात येथील कार्यक्रमात मोदींनी मला विजयी केलं नाही तर, निधी थांबवेन अशी अप्रत्यक्ष धमकी दिल्याचे सांगत मोदींचे हे वक्तव्य संसदीय मर्यादेचे उल्लंघन असल्याचे तयांनी म्हटले. अमित शहा आणि मोदी यांनी कितीही प्रयत्न केला तरी जनता त्यांना योग्य उत्तर देईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

नरेंद्र पटेल यांनी लाचखोरीचा गंभीर आरोप केला आहे. या प्रकरणाची उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांमार्फत चौकशी झाली पाहिजे. पटेल यांनी केलेल्या लाचखोरीचा आरोप हा गंभीर आहे. याप्रकरणी त्यांनी गुजरात भाजपचे अध्यक्ष जीतू वडानी यांच्यावरही निशाणा साधला. तिवारी यांनी निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले. ते म्हणाले, गुजरातची निवडणूक होईल पण आयोगाच्या स्वायत्ततेवर प्रश्नचिन्ह आहे.