टाटा सन्सच्या अध्यक्षपदावरून सोमवारी सायरस मिस्त्री यांना हटविण्यात आले. रतन टाटा यांची तात्पुरते अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. २०१२ मध्ये सायरस मिस्त्री यांनी अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारली होती. विविध उद्योग क्षेत्रांतील सुमारे १००हून अधिक कंपन्यांच्या टाटा उद्योगसमूहाची धारक कंपनी म्हणून टाटा सन्स काम पाहते.
चार महिन्यात टाटा सन्सचा नवा अध्यक्ष निवडण्यात येणार आहे. त्यासाठी एका समितीची नियुक्ती करण्यात आली आहे. ही समिती नव्या अध्यक्षाचा शोध घेणार आहे. या समितीत रतन टाटा, वेणू श्रीनिवासन, अमित चंद्रा, रोहन सेन आणि लॉर्ड के. भट्टाचार्य यांचा समावेश आहे. ही समिती चार महिन्यात नवा अध्यक्ष निवडतील.
रतन टाटा २८ डिसेंबर २०१२ रोजी टाटा सन्सच्या अध्यक्षपदावरून निवृत्त झाले होते. त्यांच्या जागी संचालक मंडळाने सायरस मिस्त्री यांची नियुक्ती केली होती. २००६ पासून सायरस मिस्त्री टाटा सन्सचे संचालक होते. नोव्हेंबर २०१२ मध्ये ते या कंपनीचे उपाध्यक्ष झाले होते.
काही दिवसांपूर्वीच सायरस मिस्त्री यांनी टाटा समूहातील कर्मचाऱ्यांशी वेबसाईटच्या माध्यमातून संवाद साधला होता. समूहाच्या खडतर काळात चपळता आणि धिटाई अंगी बाणवणे आवश्यक असल्याचे आवाहन त्यांनी कर्मचाऱ्यांना केले होते.
टाटा उद्योगसमूहाची धुरा सांभाळणारे ते सहावे अध्यक्ष तर टाटा आडनाव नसलेले दुसरे अध्यक्ष होते. या पूर्वी १९३२ मध्ये नवरोजी सकलतवाला यांनी टाटा उद्योगसमूहाची धुरा सांभाळली होती. टाटा समूहामध्ये सर्वात मोठा (१८.५%) भागीदार असणाऱ्या शापूरजी पालनजी अ‍ॅण्ड कंपनी या कंपनीचे सायरस मिस्त्री टाटा समूहामध्ये २००६ पासून संचालक आहेत.