चीनच्या हितांचा बळी दिला जाणार नसल्याचे जिनपिंग यांच्याकडून स्पष्ट

शेजारी देशांशी असलेले वाद व प्रश्न संवादाच्या माध्यमातून सोडवण्यात येतील. पण त्यात चीनच्या सामरिक हितांचा बळी दिला जाणार नाही, असे चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांनी स्पष्ट केले आहे. भारत व चीन यांच्यातील डोकलामचा वाद संपल्याचा दावा करण्यात आला असला तरी चीनचे या भागातील बांधकाम सुरू असल्याचे वृत्त आहे. त्यामुळे क्षी जिनपिंग यांनी केलेल्या वक्तव्याला विशेष महत्त्व आहे. चीनमध्ये १९४९ पासून कम्युनिस्ट पक्षाची सत्ता आहे. सत्ताधारी कम्युनिस्ट पक्षाची महत्त्वाची बैठक बुधवारी त्यांच्या उपस्थितीत सुरू झाली, त्यावेळी ते बोलत होते.

कम्युनिस्ट पक्षावर मजबूत पकड ठेवण्याचे त्यांचे इरादे यातून स्पष्ट होत आहेत. क्षी हे कम्युनिस्ट पार्टी ऑफ चायनाचे सरचिटणीस आहेत व त्यांनी पीपल्स लिबरेशन आर्मी म्हणजे चिनी लष्कराला जगातील आधुनिक लष्कर म्हणून नावारूपास आणण्याचे ठरवले आहे. या अधिवेशनात त्यांची पुन्हा पक्षप्रमुखपदी निवड होण्याची शक्यता असून त्यानंतर ते समवेत काम करणाऱ्या नवीन नेत्यांची निवड करतील. जिनपिंग यांच्या साडेतीन तासांच्या भाषणात त्यांनी लष्कराचे आधुनिकीकरण करण्यावर भर दिला आहे. ग्रेट हॉल ऑफ द पीपल येथे पक्षाचे अधिवेशन सुरू झाले असून यावेळी माजी अध्यक्ष झियांग झेमिन व हू जिंताओ, माजी पंतप्रधान वेन जियाबाव व इतर अनेक नेते त्यांच्यासमवेत मंचावर होते.

पक्षाचे हे एकोणिसावे अधिवेशन आठवडाभर चालणार आहे. जिनपिंग यांनी भ्रष्टाचारविरोधी कारवाई चालू ठेवून चीनचे पुनरुत्थान घडवतानाच समाजवादाचे नवे पर्व सुरू करण्याचे ठरवले आहे. चीन कधीच इतरांचे हित विकासाच्या आड येऊ देणार नाही. चीन आपले कायदेशीर अधिकार व हक्क सोडणार नाही, आमच्या हिताविरोधातील कुठल्याही गोष्टी सहन करणार नाही. यावेळी २३०० प्रतिनिधींनी त्यांच्या वक्तव्याचे बाके वाजवून स्वागत केले.

शेजारी देशांशी आम्हाला सलोखा, दोन्ही देशांचे हित, सर्वसमावेशकता यांच्या आधारावर संबंध हवे आहेत. आम्ही संवादातून त्यांच्याबरोबरच्या समस्या सोडवू, मतभेद मिटवण्याचे प्रयत्न करू पण चीनच्या हिताचा बळी मात्र दिला जाणार नाही, दहशतवादी कारवायांना आमचा विरोध आहे असे त्यांनी सांगितले. चीनच्या लष्करात २३ लाख जवान असून पीपल्स लिबरेशन आर्मीचे आधुनिकीकरण केले जाईल, २०३५ पर्यंत आधुनिकीकरणाची तर २०२० पर्यंत यांत्रिकीकरणाची प्रक्रिया यात पूर्ण केली जाईल असे ते म्हणाले.

माओ व डेंग यांच्यानंतरचे शक्तिशाली नेते

क्षी जिनपिंग हे माओ व डेंग यांच्यानंतरचे शक्तिशाली नेते असून त्यांची काही मूल्ये राज्यघटनेत समाविष्ट केली जाणार आहेत. त्यांची पक्षाच्या अध्यक्षपदी निवड होण्याची शक्यता असून ते २०२२ नंतरही तिसऱ्यांदा पदावर राहतील असे सांगण्यात येत आहे. सध्या ते ६४ वर्षांचे असून चीनमध्ये नेत्यांना ६८ व्या वर्षी निवृत्त व्हावे लागते. भ्रष्टाचारविरोधी लढाई चालूच ठेवण्याचा त्यांनी निर्धार व्यक्त केला असून त्यांच्या काळात आतापर्यंत २८० केंद्रीय अधिकाऱ्यांची चौकशी झाली तर १४ लाख अधिकाऱ्यांना शिक्षा झाली आहे. पक्षात हितसंबंधी गट चालणार नाहीत त्यांना रोखले जाईल, जर कुणी गुन्हे करून पलायनाचा प्रयत्न केला तर त्यांना देशात आणून शिक्षा केली जाईल असा इशारा त्यांनी दिला.