प्राप्तिकर खात्याने टाकलेल्या छाप्यात व पाहणीत गेल्या तीन वर्षांत ७१९४१ कोटी रुपयांचे बेहिशेबी उत्पन्न उघड झाले, अशी माहिती केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयाला दिली आहे.

गेल्या वर्षी ९ नोव्हेंबरपासून या वर्षी १० जानेवारीपर्यंत ५४०० कोटी रुपयांचे बेहिशेबी उत्पन्न उघड झाले व एकूण ३०३.३६७ कोटींचे सोने जप्त करण्यात आले, असे अर्थ मंत्रालयाने सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे.

१ एप्रिल २०१४ ते २८ फेब्रुवारी २०१७ दरम्यानच्या काळातील तपशील यात दिला असून, प्राप्तिकर खात्याच्या २०२७ पथकांनी या काळात ३६०५१ कोटींचे बेहिशेबी उत्पन्न उघड केले आहे. त्याशिवाय २८९० कोटी रुपयांची बेहिशेबी मालमत्ता जप्त करण्यात आली होती. १ एप्रिल २०१४ ते २८ फेब्रुवारी २०१७ या काळात प्राप्तिकर खात्याने १५००० पाहण्या करून जी माहिती गोळा केली त्यात ३३ हजार कोटींचे बेहिशेबी उत्पन्न उघड झाले आहे. निश्चलनीकरणाच्या काळात सरकारने केलेल्य कामगिरीचा उल्लेख यात आहे. त्यानुसार एकूण ६१० कोटी रुपये जप्त करण्यात आले, त्यात ५१३ कोटी रुपये रोख होते.

नवीन चलनातील ११० कोटी रुपयांचा यात समावेश आहे. या काळात एकूण ५४०० कोटींचे बेहिशेबी उत्पन्न उघड झाले आहे. पाचशे व हजाराच्या जुन्या नोटा बदलून घेण्यास मुदतवाढ देण्यास अर्थ मंत्रालयाने नकार दिला होता. ११ जुलैला गृह खात्याने गुप्तचर संस्थांनी दिलेल्या माहितीच्या आधारे असे म्हटले होते, की नोटा बदलण्यास सारखी मुदतवाढ दिल्याने त्याचा गैरवापर होत आहे. नोव्हेंबर ते डिसेंबर २०१६ दरम्यान १४७.९ कोटी रुपये जप्त करण्यात आले.