राज्यसभेत सरकार अल्पमतात असल्याने महत्त्वाची विधेयके संमत होण्यासाठी विरोधकांनी जनहिताच्या दृष्टीने सहकार्य करावे, असे आवाहन संसदीय कामकाजमंत्री वेंकय्या नायडू यांनी केले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विकासाचे राजकारण सुरू ठेवले असून, त्यासाठी काँग्रेसने सहकार्य करावे, असे नायडू यांनी सांगितले. राज्यसभेत त्या दृष्टीने काँग्रेस व मित्रांनी सहकार्य करावे, असे नायडू यांनी सुचवले. विमा व कोळसा विधेयके राज्यसभेत मंजूर झाली असून, राज्यसभेत सरकारपुढे आव्हान आहे. भू-संपादन विधेयक शेतकऱ्यांच्या दृष्टीने अनुकूल असल्याचा दावा त्यांनी केला. आपला जो याबाबतचा कायदा होता तो १८९४ ते २०१३ पर्यत चालत आला, असे त्यांनी स्पष्ट केले. विकासकामांसाठी जमिनीची गरज लागते. त्यामुळे भूसंपादनाशिवाय ही कामे कशी करणार, असा सवाल त्यांनी केला. याबाबत जर काही सूचना असतील तर स्वागत आहे, असे पंतप्रधानांनी सांगितल्याचे नायडू यांनी निदर्शनास आणून दिले.