माझा किंवा माझी पत्नी किरण राव हिचा देश सोडण्याचा कोणताही विचार नसून, भारतीय असल्याचा मला अभिमान असून देशावर माझे प्रेम आहे, असे स्पष्टीकरण अभिनेता आमीर खान याने बुधवारी एका निवेदनाद्वारे दिले. या माध्यमातून आमीरने गेल्या दोन दिवसांपासून त्याच्यावर होत असलेल्या टीकेला उत्तर देण्याचा प्रयत्न केला आहे.
‘रामनाथ गोएंका एक्सलन्स इन जर्नालिझम’ पुरस्कारांच्या वितरणप्रसंगी आयोजित कार्यक्रमात आमिरने सोमवारी देशातील असहिष्णुतेच्या वाढत्या घटनांमुळे आपण चिंतीत झालो असून, माझी पत्नी किरणने देश सोडण्याविषयीही सुचवले होते, असे म्हटले होते. त्याच्या या वक्तव्यानंतर आमीरविरोधात काही नेत्यांनी आणि सोशल मीडियावरील काही व्यक्तींनी तीव्र नाराजी व्यक्त करीत त्याच्या निषेधाचे सूर व्यक्त केले होते. त्याचवेळी काही जणांनी आमीरच्या वक्तव्याचे समर्थनही केले होते. या पार्श्वभूमीवर आमीरने बुधवारी एक निवेदन प्रसिद्ध केले. त्यात त्याने म्हटले आहे की, भारत माझा देश आहे. या देशात जन्म घेतल्याचा मला अभिमान आहे. माझा किंवा पत्नी किरण राव हिचा देश सोडून जाण्याचा कोणताही विचार नाही. भविष्यातही आम्ही कधी देश सोडून जाणार नाही. जे कोणी असा दावा करताहेत. त्यांनी एकतर माझी मुलाखत नीट ऐकलेली नाही किंवा ते समाजात गैरसमज पसरविण्याचा प्रयत्न करीत आहेत. जे कोणी मला देशद्रोही ठरविण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यांना मी एवढेच सांगू इच्छितो की मी देशप्रेमी आहे. त्यासाठी मला कोणाच्याही दाखल्याची गरज नाही. मुलाखतीवेळी मला विचारलेल्या प्रश्नांवर मी जी उत्तरे दिली. त्यावर मी ठाम आहे, असेही त्याने म्हटले आहे
माझ्यावर टीका होत असताना जे कोणी माझ्या पाठीमागे उभे आहे. त्या सर्वांना मी धन्यवाद देतो. आपल्या सर्वांना या सुंदर देशाची काळजी घ्यायची आहे. देशाची एकता, अखंडता, विविधता, संवेदनशीलता, भाषिक वैविध्यता या सर्वाचे संरक्षण करायचे आहे. आपल्या निवेदनाचा शेवट त्याने रविंद्रनाथ टागोर यांच्या एका कवितेने केला आहे.