उत्तराखंडमधील २३ वर्षीय तरुणीवर दिल्लीत झालेल्या सामूहिक बलात्काराचे पडसाद देशभर उमटत असतानाच दिल्ली उच्च न्यायालयाने या प्रकरणी स्वतच दखल घेत दिल्ली पोलिसांवर टीका केली आहे. उच्च न्यायालयात या प्रकरणी खटला दाखल करून घटनेचा साद्यंत अहवाल सादर करण्याचे आदेश न्यायालयाने बुधवारी दिल्ली पोलिसांना दिले. न्यायालयाने दिल्लीच्या पोलीस आयुक्तांना येत्या दोन दिवसांत या घटनेचा अहवाल सादर करण्याची सूचना केली असून काळ्या काचांच्या गाडय़ांवर तातडीने कारवाई करण्याचे निर्देशही दिले आहेत. देशाच्या राजधानीत चालत्या बसमध्ये एका तरुणीवर सामूहिक बलात्कार होतो ही लज्जास्पद बाब असून पोलिसांची कर्तव्यशून्यताच यातून दिसून येत असल्याचे उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश डी. मुरुगेशन यांनी स्पष्ट केले.