वस्तू व सेवांच्या उपभोगाचा व्यक्तिगत निर्णय व त्याचा अर्थव्यवस्थेवर होणारा परिणाम यांचा अभ्यास करीत सूक्ष्म व स्थूल अर्थशास्त्रासोबत विकासात्मक अर्थशास्त्रात आमूलाग्र बदल घडविणारे अभ्यासक अँगस डिटन यांना यंदाचे अर्थशास्त्राचे नोबेल पारितोषिक जाहीर करण्यात आले. मूळचे स्कॉटिश असलेले डिटन  सध्या ब्रिटन- अमेरिकेचे नागरिक आहेत.

समाजकल्याण व दारिद्रय़ निर्मूलन ही दोन उद्दिष्टे साध्य करणारे धोरण आखता येते, त्यासाठी व्यक्तिगत वस्तू व सेवा वापरांच्या पर्यायांचा अभ्यास करणे आवश्यक असते. त्याबाबतचे आकलन अँगस डिटन यांच्या संशोधनाने वाढल्याचे, रॉयल स्वीडिश अकादमीने म्हटले आहे डिटन हे अमेरिकेच्या प्रिन्स्टन विद्यापीठात १९८३ पासून अर्थशास्त्र व आंतरराष्ट्रीय कामकाज या विषयाचे प्राध्यापक आहेत. त्यांना जाहीर झालेला पुरस्कार ८० लाख स्वीडिश क्रोनर म्हणजे साडेनऊ लाख डॉलरचा  आहे. १० डिसेंबरला स्टॉकहोम येथे हा पुरस्कार दिला जाणार आहे. अर्थशास्त्राचे नोबेल १९६८ मध्ये स्वीडिश मध्यवर्ती बँकेच्या त्रिशताब्दीनिमित्त सुरू करण्यात आले.

नोबेल मिळण्याची तीन कारणे

डिटन यांनी १९८० च्या सुमारास सहकारी जॉन म्युएलबर यांच्या सहकार्याने विविध वस्तूंच्या मागणीचा अंदाज कसा बांधावा हे शोधून काढले. वस्तूंचा वापर व प्रत्यक्ष उत्पन्न यांची सांगड त्यांनी १९९० मध्ये अभ्यासाअंती घालून दिली. त्यानंतरच्या काळात त्यांनी विकसनशील देशातील जीवनमान व दारिद्रय़ मापन यांचे संशोधन केले, त्यासाठी अनेक कुटुंबांचे सर्वेक्षण केले.