दादरी घटनेवरून उपराष्ट्रपतींची स्पष्टोक्ती

प्रत्येकाचा जगण्याचा हक्क सरकारने जपलाच पाहिजे, मग तो कोणत्याही जातीधर्माचा असो, असे खडे बोल उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांनी गुरुवारी सरकारला सुनावले आहेत. उत्तर प्रदेशातील गौतम बुद्ध नगर जिल्ह्य़ातील दादरी येथे एका कुटुंबाने गोमांस खाल्ल्याच्या आणि घरात ठेवल्याच्या अफवेवरून त्या कुटुंबातील महम्मद अखलाख या कर्त्यां पुरुषाचा जमावाच्या मारहाणीत मृत्यू ओढवला. त्या पाश्र्वभूमीवर व्यथित झालेल्या उपराष्ट्रपतींनी ही स्पष्टोक्ती केली.

उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईक यांच्या उपस्थितीत झालेल्या कौमी एकता संमेलनात ते बोलत होते. कलम २१ नुसार भारतीय राज्यघटनेने प्रत्येक नागरिकाचा जगण्याचा हक्क स्पष्टपणे नोंदवला आहे. मग तो नागरिक कोणत्याही जाती-धर्माचा वा पंथाचा असो, असे अन्सारी यांनी नमूद केले.

प्रत्येक नागरिकाला सुरक्षित जीवनाची मागणी करण्याचा अधिकार आहे आणि जोवर नागरिकांच्या सुरक्षित जगण्याचीच हमी नाही तोवर विकास साधला जाऊ शकत नाही, या शब्दांत विकासाच्या शाब्दिक चर्चेवरही अन्सारी यांनी बोट ठेवले आहे. देशाच्या प्रगती आणि विकासासाठी देशवासीयांमधील ऐक्यभावना महत्त्वाची आहे, असे त्यांनी सांगितले.जोवर धार्मिक सौहार्दासाठी कार्यक्रम आयोजित करावे लागतात तोवर या ऐक्यभावनेत काही तरी उणीव राहिली असलीच पाहिजे. ही ऐक्यभावनाच दृढ केली पाहिजे, असे ते म्हणाले.

दोन तरुणांचा दबाव?

अखलाख यांच्या कुटुंबाने गोमांस खाल्ल्याचे दादरीतील एका मंदिरातील पुजाऱ्याने प्रथम लोकांना सांगितले. बिसारा गावातील दोन तरुणांनी  हे खोटे बोलायला भाग पाडल्याचे पुजाऱ्याने पोलिसांना सांगितले आहे.