भारताचा माजी क्रिकेटपटू आणि प्रसिद्ध समालोचक नवज्योतसिंग सिद्धू यांना मंगळवारी रात्री दिल्लीच्या इंद्रप्रस्थ अपोलो रूग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्या शरीरातील रक्तपुरवठा करणाऱ्या पेशीमध्ये गाठ निर्माण झाल्याची माहिती डॉक्टरांकडून देण्यात आली आहे. या स्थितीला डीप व्हेन थ्रोम्बोसिस (डीव्हीटी) म्हणतात. योग्य वेळी त्यावर उपचार झाला नाही तर त्यांच्या जिविताला धोका उद्भवू शकतो. रक्तपुरवठा करणाऱ्या धमन्यांमध्ये डीव्हीटीमुळे अडथळा निर्माण होतो, असे रूग्णालयाकडून जारी करण्यात आलेल्या पत्रकात सांगण्यात आले. मात्र, प्राथमिक उपचारांनंतर सिद्धू यांची प्रकृती स्थिर झाली आहे. सध्या सिद्धू यांच्या शरीरातील रक्तपुरवठा सुरळीत करण्यासाठी डॉक्टरांकडून ब्लड थिनर्सचे उपचार सुरू आहेत. सिद्धू यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचेही यावेळी डॉक्टरांनी सांगितले. दरम्यान, सिद्धू यांनी “डाऊन बट नॉट ऑऊट” असे ट्वीट करत स्वत:चे रुग्णालयातील छायाचित्र अपलोड केले आहे. मागील आठवड्यात कैलास मानसरोवर यात्रेदरम्यान सिद्धूला दुखापत झाली होती. त्यामुळे हा त्रास उद्भवला असण्याची शक्यता असल्याची माहिती सिद्धू यांची पत्नी नवजोत कौर यांनी दिली.