दिल्लीतील सामूहिक बलात्काराची घटना ताजी असतानाच नोएडामध्ये पुन्हा एक सामूहिक बलात्कार आणि हत्येची घटना गेल्या शनिवारी उघडकीस आल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. एका कारखान्यात काम करणाऱ्या २१ वर्षीय तरुणीवर  सामूहिक बलात्कार करून तिची निर्घृण हत्या केल्याच्या आरोपाखाली नोएडा पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे.
पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींची नावे नरेश आणि कैलाश असून त्यांचा आणखी एक साथीदार अद्याप फरार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक प्रवीण कुमार यांनी सोमवारी दिली.
नरेश हा पीडित तरुणी काम करीत असलेल्या गार्मेट हाऊसमध्ये काम करीत होता. दोघांची ओळख झाल्यानंतर त्याने पीडित तरुणीला लग्नाचे वचन दिले होते. मात्र नरेशचे लग्न झाल्याचे कळल्यावर तिने त्याच्याशी संपर्क तोडला होता. तसेच नरेशविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार करण्याचाही इशारा दिला होता. या प्रकाराने घाबरलेल्या नरेशने तिला ठार मारण्याची योजना आखल्याची माहिती पोलिसांनी दिली.
पोलिसांनी अधिक चौकशी केल्यानंतर नरेशने कबूल केले की, त्याने सदर तरुणीला फसवून एका अर्धवट अवस्थेत बांधकाम झालेल्या कारखान्यात बोलावून घेतले. तिथे त्याचे साथीदार कैलाश आणि उदयवीर आधीच हजर होते. या दोघांनी काही वर्षांपूर्वी सदर तरुणीच्या घरात जाऊन तिचा विनयभंग केला होता. त्यांच्याविरोधात या तरुणीने पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. या तरुणीवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आल्याचे आढळून आले आहे. मात्र वैद्यकीय अहवालानंतरच बलात्काराच्या घटनेची पुष्टी होईल, असे पोलिसांनी सांगितले.
दरम्यान, या घटनेची तक्रार दाखल करून घेण्यास सुरुवातीला पोलिसांनी टाळाटाळ केली तसेच पीडित तरुणीचा मृतदेह ताब्यात देण्यासही विनाकारण विलंब लावल्याचा आरोप तिच्या नातेवाईकांनी केला. या घटनेची गंभीर दखल घेत चार पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. पीडित तरुणी घरातील कमावती होती. अधिक पैसे मिळावेत म्हणून हत्येच्या दिवशी ती कारखान्यात जास्त वेळ काम करीत होती. मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी मृत तरुणीच्या नातेवाईकांना १५ लाखांची नुकसानभरपाई तसेच एका व्यक्तीला नोकरी देण्याची घोषणा केली आहे.