राजधानीत सामूहिक बलात्कारची बळी ठरलेल्या ‘त्या’ पीडित तरुणीची प्रकृती बुधवारी अधिकच खालावली. तिला अधिक उपचारासाठी बुधवारी रात्री तातडीने सिंगापूर येथे हलवण्यात आले. विशेष विमानाने तिला सिंगापूर येथे नेण्यात आल्याचे सफदरजंग रुग्णालयाच्या सूत्रांनी सांगितले.
या तरुणीला उपचारासाठी सिंगापूरला हलवण्याचा निर्णय केंद्र सरकारच्या उच्च पातळीवर झाला. केंद्रीय गृहमंत्रालयाने सिंगापुरातील रुग्णालयाशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधून तरुणीवर उपचार करण्याची व्यवस्था केली. सफदरजंग रुग्णालयातील वैद्यकीय तज्ञांचे पथकही बुधवारी रात्री सिंगापूरला रवाना झाले.  उपचाराचा सर्व खर्च केंद्र सरकारतर्फे केला जाणार आहे.
केंद्राकडून चौकशी आयोग स्थापन
दरम्यान, बलात्कार प्रकरणाची चौकशी करण्यासाठी केंद्र सरकारने माजी निवृत्त न्यायमूर्ती उषा मेहरा यांच्या नेतृत्वाखाली चौकशी आयोगाची स्थापना बुधवारी केली. त्याचबरोबर पीडित तरुणीचा जबाब नोंदविताना पोलिसांनी हस्तक्षेप केल्याच्या आरोपाच्या चौकशीचे आदेशही  देण्यात आले आहेत. हा जबाब आता या प्रकरणात वादाचा मुद्दा ठरत आहे.
पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखाली मंत्रिमंडळाची बैठक झाली.
सामूहिक बलात्काराला कारणीभूत ठरलेले यंत्रणेतील दोष आणि त्यावरील उपाययोजना चौकशी आयोग सुचवील. त्याने तीन महिन्यात अहवाल सादर करावयाचा आहे. बैठकीत अनेक मंत्र्यांनी बलात्काराच्या घटनेबाबत तीव्र संताप व्यक्त केला. सरकारने आपली कामकाजाची चौकट बाजूला ठेवून या प्रकरणी पीडित महिलेच्या मदतीसाठी आणि महिलांच्या सुरक्षिततेसाठी पावले उचलावीत, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.     
शीला दीक्षित – दिल्ली पोलीस वादंग सुरूच
मुख्यमंत्री शीला दीक्षित यांनी दिल्ली पोलिसांवर जबाब घेण्यासंदर्भात केलेल्या आरोपांची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले असून, एका ज्येष्ठ अधिकाऱ्यामार्फत ती केली जाईल, असे या बैठकीत गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी सांगितले, अशी माहिती अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी दिली. दीक्षित यांनी केलेले आरोप खोडून काढणारे पत्र दिल्लीचे पोलीस आयुक्त नीरज कुमार यांनी गृहमंत्रालयाला पाठविले आहे.