फळ्यावर सुविचार लिहिता लिहिता अनेक हुशार विद्यार्थ्यांशी मत्री झाली. अक्षरं माणसं जोडतात याचा प्रत्यय येऊ लागला..अक्षरांना भावना, वेगवेगळे आकार, रूपं असू शकतात याचा खूप मोठा संस्कार  शाळेतल्या सरांनी माझ्यावर केला. तो इतका मोठा आणि महत्त्वाचा ठरला की, त्याच्यातून मी यशाच्या पायऱ्या चढत गेलो आणि अधिकच गुंतत गेलो.. रेषेचा वेग वाढत होता तशी अक्षरसौंदर्यही कळायला अधिक मदत होत होती. नंतरच्या काळात माझ्यावर प्रभाव पडत गेला, अनेकांनी तयार केलेल्या सार्वजनिक गणपतीच्या मूर्तीचा.. मनापासून व्यक्त होणं.. मनात ज्या गोष्टींची कालवाकालव होत आहे त्यांचं कागदावर उमटणं.. माझ्यातल्या अक्षररेषेच्या प्रवासात सातत्याने बदल होत होता. लालबागचा राजा म्हणून प्रसिद्ध असलेल्या गणपतीची पहिल्या दिवशी पूजा करण्याचा मान मिळाला.. यातूनच ‘अक्षर गणेश’ ही कल्पना साकार झाली आणि चिंचपोकळीच्या चिंतामणीला एक वेगळं रूप देता आलं..

आयुष्यातील महत्त्वाचं कार्य समजून एक सरळ रेषा.. उभी आणि आडवी काढ.. हा कानमंत्र आजही लक्षात आहे आणि राहील. इयत्ता आठवी-दहावीकरिता के. एम. एस. डॉ. शिरोडकर हायस्कूल, परळ म्युनिसिपल शाळेत जायला सुरुवात झाली. जेमतेम ५४ टक्के मिळाल्यामुळे मागच्या बाकावर बसण्याची वेळ आली होती.. किंबहुना त्याचसाठी प्रवेश मिळाला होता. शाळेत क्रीडा, नाटय़, चित्रकला यांना अभ्यासाइतकंच महत्त्व दिलं जात होतं. दररोज फळ्यावर सुविचार असायचा. फलक लेखन ही स्पर्धाच असायची. यासाठी एका विद्यार्थ्यांची निवड होत असे. त्याला ‘सुशोभन मंत्री’ म्हणायचे. पुढे बसणारे सगळे हुशार असल्याने प्रथमाधिवेशन संपलं की १० मिनिटं अगोदर वर्गात जाऊन फळा स्वच्छ  करून सुंदर विचार फळ्यावर लिहायला कोणी तयार होत नसत.

guru asta 2024
१४ दिवसांनी गुरु होणार अस्त! ‘या’ राशींच्या नशिबाचं टाळं उघडणार; नोकरीपासून प्रेमापर्यंत प्रत्येक कामात मिळू शकते यश
sun and jupiter conjunction in aries
१२वर्षांनंतर झाली सूर्य आणि गुरुची युती! या राशींचा सुरु होईल सुवर्णकाळ! मिळेल अमाप पैसा
Delayed purchase of passenger vehicles by 3 lakh 22 thousand 345 customers in the month of March
प्रवासी वाहनांच्या विक्रीत घट, मार्च महिन्यात ३ लाख २२ हजार ३४५ ग्राहकांकडून खरेदी लांबणीवर
Surya Grahan 2024
४ दिवसांनी हिऱ्यापेक्षाही जास्त चमकणार ‘या’ राशींचे नशीब? ५०० वर्षांनी सूर्यग्रहणाला चार ग्रहांची महायुती होताच मिळू शकतो पैसा

अचानक एके दिवशी सर माझ्याजवळ आले नि म्हणाले, ‘‘उद्यापासून फळ्याचं सुशोभन करण्याची जबाबदारी तुझी.’’ दोन मिनिटं मला ते काय बोलताहेत ते कळलंच नाही. मी हुशार नव्हतो किंवा चित्रकला खूप चांगली होती, असंही काही नव्हतं. पण लालबागला राहत असल्याने शाळेत येता-जाता खूप काही गोष्टी नजरेस पडायच्या. पेरू चाळ कंपाऊंडच्या नाक्यावर कबड्डी स्पध्रेचे फलक लागत. पहिल्या फेरीपासून फायनलपर्यंत प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या पद्धतीने फलक रंगविले जात. बराच वेळ थांबणं.. रेंगाळणं व्हायचं.. माझ्या मनावर झालेला हा पहिला अक्षर-संस्कार होता. मी पटकन सरांना ‘हो’ म्हणून सांगितलं आणि आयुष्यातील महत्त्वाचं कार्य समजून मी फळ्यावर एक आडवी सरळ रेषा काढली.. दुसरी रेषा काढताना नेमकी किती अंतरावर काढावी याचा अंदाज येत नव्हता.. पण जी काढीन तीच अक्षराची उंची असेल.. झालं.. सुविचार लिहिता-लिहिता अनेक हुशार विद्यार्थ्यांशी मत्री झाली. अक्षरं माणसं जोडतात याचा प्रत्यय येऊ लागला.

काही दिवसांनंतर अक्षरांची उंची अगदी लीलया बदलू लागलो. जाड, बारीक, पसरट, उभी, आडवी, तिरकी, शॅडो.. पुढच्या तीन वर्षांत इतके प्रकार केले की शाळेच्या मंत्रिमंडळात ‘सुशोभन मंत्री’ म्हणून नेमणूक झाली. या सगळ्यात महत्त्वाचा वाटा शाळेचा तर होताच, परंतु चित्रकला शिक्षक परशुराम नाबर यांचाही होता. ज्या विश्वासानं मला त्यांनी समजावलं, शिकवलं.. वेळोवेळी संधी दिली ती माझ्यासाठी मोलाची ठरली. अक्षरांना भावना, वेगवेगळे आकार, रूपं असू शकतात याचा खूप मोठा संस्कार त्यांनी माझ्यावर केला. तो इतका मोठा आणि महत्त्वाचा ठरला की त्याच्यातून मी यशाच्या पायऱ्या चढत गेलो आणि अधिकच गुंतत गेलो. याचा आज आनंद होत आहे.

दहावी पास झालो तोही कसाबसा. कारण सगळं लक्ष अक्षरात गुंतलं होतं. येता-जाता अक्षराचं निरीक्षण करणं, मनातल्या मनात वळण घोळवणं, कुणी साईन बोर्ड करत असला की तासन्तास उभं राहून पाहत राहणं.. लालबागला गणेश टॉकीजसमोर राहत होतो. त्यात दर शुक्रवारी चित्रपट बदलत असल्याने थ्रीडी लेटर काय असतं ते चांगलंच मनावर ठसलं होतं. आजही ‘चंदा और बिजली’चं रात्री चकाकणारं पोस्टर व लेटिरग डोळ्यासमोरून जात नाही. बििल्डगच्या खाली ‘धुरी आर्टस्’ नावाचा छोटासा खोका होता.. ब्रशने थेट अक्षरं रेखाटणं किती कठीण असतं, पण सराव असेल तर सहजशक्य असतं, याची जाणीव नकळतपणे झाली होती. ‘जेजे’चे वेध लागले होते. शालेय शिक्षण घेताना आपण जे शिकलो तेच पुढे करता येईल का? नेमका त्याचा उपयोग कसा आणि कुठे करायचा? लेटिरग आणि कॅलिग्राफीमधला नेमका फरक काय? नेमकं मी जे केलेय ते काय आहे? असंख्य प्रश्न मनात भेडसावत होते. इंटरमिजिएटमध्ये बी ग्रेड असल्याने फाऊंडेशनकरिता प्रवेश मिळाला, पण पुढे कमíशअल करायचे असेल तर चार वष्रे काढावी लागणार.. शिवाय फाऊंडेशनला मार्क्‍सही चांगले मिळाले पाहिजेत.. आणि उपयोजित कलेत पुढील शिक्षणासाठी प्रवेश मिळाला.

आपण शाळेत फळ्यावर काढलेली अक्षरं.. त्यांची उंची.. ही गणितं सगळी बदललेली होती. इथे आल्यावर मी काढलेलं प्रत्येक अक्षर डिझाइन वाटू लागलं होतं. थिक, थिन, बोल्ड, एक्सपान्डेड, कन्डेन्स्ड आदी अक्षरांच्या असंख्य जाती कळू लागल्या होत्या. पॉझिटिव्ह-निगेटिव्ह हा डिझाइनचा मुख्य भाग अक्षरांच्या आकारात महत्त्वाचा असल्याने तो पुढे पुढे सगळ्याच गोष्टी समजून घ्यायला महत्त्वाचा ठरणार आहे, याची जाणीव झाली होती. फळ्यावर सहा इंचाची अक्षरं लिहीत होतो आणि अचानक १०,१२,१५ अशा पॉइंटची अक्षरं असतात हे कळलं आणि इंचाची किंवा फुटाची भाषा जाऊन पॉइंट साईजमध्ये काम करावं लागणार याचीही प्रचीती आली. थोडक्यात, पुढच्या चार वर्षांसाठी एक नवा डाव सुरू झाला.. हा डाव कसा रंगवायचा.. सुशोभित करायचा हे सर्वस्वी माझ्यावरच असणार याची जाणीव झाली होती.

दुसऱ्या वर्षांला असतानाच या विषयातले ज्येष्ठ आणि श्रेष्ठ श्री.र. कृ. जोशी यांचं लेक्चर आहे असं सांगितलं गेलं. परत एकदा असंख्य प्रश्नांची सरबत्ती मनातल्या मनात सुरू झाली.. प्रत्येक शिक्षक, सीनिअर्स र.कृ.विषयी आदरानं बोलत होते आणि अखेर तो दिवस आला. प्रात्यक्षिक पाहिल्यानंतर शाळेपासून आतापर्यंत जे काही करीत होतो त्याच्या पुढचा मार्ग मला दिसू लागला. कॅलिग्राफी आणि टायपोग्राफीमधला नेमका फरक काय तो त्यांच्याकडून समजला. शालेय जीवनात सुविचार लिहिताना अक्षरांची वळणं घोटून घोटून पाठांतर केली होती; पण त्या प्रत्येक वळणाला.. अक्षराला प्रमाण असतं, त्यात सौंदर्य असतं.. अशा अनेक गोष्टींची नव्याने ओळख झाली होती. अक्षरं तीच होती.. शब्द तेच होते, फक्त नेमका बदल काय आणि कुठे होत होता, हे लक्षात येत होतं..

एलिमेंटरी ते डिप्लोमा या चार वर्षांच्या कालावधीत मी अक्षरांचा आणि अक्षरांनी माझा भरपूर समाचार घेतला होता. एकमेकांची भाषा जाणू लागलो होतो. चौथ्या वर्षांच्या शेवटी कॅलिग्राफी आणि टायपोग्राफी हाच विषय कायम ठेवून पहिल्या वर्गात पास झालो. माझ्या विषयात महाराष्ट्रात पहिला आलो.. सुरुवातीचं फलक लेखन.. मग शिकत असताना कलेचे साइन बोर्ड, बॅनर, गणपतीची डेकोरेशन्स यामुळे हातावर खूप ताबा होता.. त्यावेळी संगणक नव्हता.. त्यामुळे लोगो किंवा हेडलाइन (लेटिरग-अक्षररेखांकनं) हातानं करणाऱ्यांना जास्त मागणी असायची. तिसऱ्या वर्षांला असताना क्रिएटिव्ह युनिट या एजन्सीत टाटा कंपनीच्या ‘ओके’ साबणाच्या जाहिरातीचं काम चालू होतं. प्रेझेन्टेशनसाठी लेटिरग करण्यासाठी मुलांची गरज होती. माझ्या वर्गशिक्षिका करंडे यांनी माझं नाव सुचवलं आणि मी गेलो.. पुढे आपल्याला काय प्रकारचं काम करावं लागणार याची थोडक्यात जाणीव तिथे झाली. पुढे एका छोटय़ाशा एजन्सीत कामाला सुरुवातही झाली.. पण लक्ष लागत नव्हतं.. फळ्यावर मग कागदावर स्वैरपणे अक्षरांशी खेळलो होतो.. सहा इंचांपासून ६० इंचांपर्यंतची अक्षरं अगदी सहजपणे काढीत होतो.. आणि अचानक एका वर्तमानपत्राच्या कला विभागात फ्रीलान्सर म्हणून मला जागा मिळाली.. त्यानंतर अनेक वृत्तपत्र आणि मॅगझिन्सना हेडलाइन्स हाताने किंवा टाइप कंपोझिंग करून दिल्या. हाताने करता करता काही जणांनी माझे काम पाहिले आणि पुढे काय तरी चांगलं करता आलं तर बघ, असा सल्ला दिला.

इथेच मराठी अक्षरांना सुंदर बनविणारे कमल शेडगे यांची ओळख झाली. सत्यनारायण वाडीशेरला, प्रदीप शेडगे, नाना शिवलकर, नाफडे, महातेकर अशा असंख्य रथी-महारथींची ओळख झाली. त्यावेळचे कलाविभाग प्रमुख रमेश संझगिरी यांच्या मार्गदर्शनाखाली इंग्लिश टाइप मराठीत कसा करायचा, याचं मार्गदर्शन मिळालं आणि ऑप्टिमा टाइप मराठी करण्याचा प्रयत्न केला.. त्यावेळी मराठीत टाइप नसल्याने इंग्रजी टाइपप्रमाणे मराठी टाइप करायची, अशी पद्धत आली होती. बऱ्याच लोगोंचं कामही त्या काळात मी केलं होतं. जेमतेम चार महिने काम केलं आणि मग ‘श्री’ साप्ताहिकात काम करू लागलो.. परत तोच श्रीगणेशा हेडलाइन्स.. लेआऊट काही तरी वेगळं करावं, असं सारखं मनाला वाटत होतं. असं असतानाच ‘उल्का अ‍ॅडव्हर्टायझिंग’च्या वतीने स्कॉलरशिप जाहीर झाली.

अर्थात यामागे र.कृ.च होते. नवीन विद्यार्थ्यांना संधी देऊन काही तरी नवीन पाहायला मिळेल, यासाठी ते सतत प्रयत्नशील असायचे. संधी चालून आलेली होती. सहज बोलता बोलता, ‘काही तरी नवीन कर ना! मोडी लिपीवर काम का करत नाही,’असं साठय़ेसर सांगून गेले अन् नेमका तोच धागा पकडून मी माझं प्रेझेन्टेशन केलं.. प्रयत्नाला यश आलं.. ‘मोडी लिपी १५ वे १८ वे शतक’ असा अभ्यासाचा विषय ठरला..भाषातज्ज्ञ डॉ.अशोक केळकर यांच्या मार्गदर्शनाखाली चित्रकार व नेपथ्यकार द. ग. गोडसे.. इतिहासकार.. ग. ह. खरे आणि स्वत: र. कृ ..एका नवीन रेषेच्या प्रवासाला सुरुवात झाली होती. अक्षरांना वेग आला होता..

अक्षरं ही केवळ अक्षरं म्हणून न पाहता त्यांच्या इतिहासाबरोबर त्यांची सौंदर्यस्थानंही तितकीच महत्त्वाची आहेत. काळानुरूप झालेला बदल का कसा घडला, हे या अभ्यासात खूप महत्त्वाचं होतं. एका सरळ रेषेवर ऱ्हस्व-दीर्घाची तमा न बाळगता केवळ सोय हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून लिहिली गेलेली ही लिपी.. ज्या लिपीनं मराठी राजेशाहीची असंख्य स्थित्यंतरं पाहिली.. वेगवेगळ्या वळणांनी लिहिली गेली. या सगळ्याचा आढावा घेऊन एक नवीन मत आणि लिपी निर्माण करता येईल का? यातूनच मोडीसारखी दिसणारी आणि लिहिली जाणारी पण समजायला देवनागरीसारखी सोप्पी.. मुक्त लिपी निर्माण केली. पुढे महाराष्ट्र शासनाच्या रौप्यमहोत्सवी वर्षांनिमित्त काढलेल्या ‘महाराष्ट्र’ या पुस्तकाच्या शीर्षकासाठी या लिपीचा वापर केला गेला.. आणि मग शिवकालीन / पेशवेकालीन येणाऱ्या चित्रपट, मालिका अशा कारणासाठी वापरली गेली.. रेषेचा वेग वाढत होता तसा अक्षरसौंदर्यही कळायला अधिक मदत होत होती. अक्षरातला नेमका बदल कसा होत होता, हे समजण्यास या काळात आणि अभ्यासात खूप मदत झाली. सुरुवातीला ताडपत्र, भुर्जपत्र आणि मग कागद प्रत्येक गोष्टीत त्याचा पृष्ठभाग महत्त्वाचा होता.. यामुळे लेखनशैलीत कसा बदल होत गेला हे कळलं; परंतु वेगवेगळ्या वळणांचा अभ्यास करता आला.

हा सगळा प्रवास घडत होता तो लालबागच्या दहा बाय दहाच्या रूममध्ये.. आम्ही सात भावंडं, आई-बाबा.. सगळ्यांची कामं संपली की मी रात्री कामाला बसत असे.. कधीतरी गॅलरीत झोपलेला माणूस झोपेत उठून थुंकायचा तेव्हा त्याचे िशतोडे माझ्या असायन्मेंटवर पडायचे आणि त्या दिवसाची मेहनत फुकट गेलेली असायची.. असं अनेक वेळा घडायचं, पण सकाळी आई-बाबा,भाऊ समजूत काढायचे.. मी त्यांचे खूप आभार मानतो. कारण या सगळ्यातलं काही कळत नसतानासुद्धा मला प्रोत्साहन दिले. तुला जे योग्य वाटेल ते कर, पण जे काय करशील ते सॉलिड कर, असं त्याचं म्हणणं असायचं.. त्या बिचाऱ्यांना आजही माहीत नाही की कॅलिग्राफी म्हणजे नक्की काय? घरच्यांप्रमाणे खरी साथ दिली असेल, तर ती लालबागच्या गणपती उत्सवाने!

घराच्या खाली रावले यांचा गणपतीचा कारखाना.. घरातून गॅलरीत आलो की असंख्य गणपतींचं दर्शन घडायचं.. गणेशोत्सव असो वा नसो, बारमाही गणपतीचं काम चालू असायचं.. गणपतीच्या दिवसांत कधी तरी गणपतीच्या देहाला रंग लावायला आम्हाला बसवत असत. डोळ्यांची लिखाई करताना मी तर तासन्तास बघत बसायचो..पूर्ण झालं की प्रत्येक गणपती माझ्याकडे बघत आहे, असा भास व्हायचा. पुढे गणपतीची अनेक रूपं पाहता आली. विजय खातूंचे वडील, पाटकर, पोयरेकर आणि मग सर्वार्थानं गणपतीला एका वेगळ्या शैलीत पेश केलं ते दीनानाथ वेलिंग यांनी. सहा फूट उंचीचा माणूस २८ फूट गणपती जागेवर उभा करतो तो त्याच्याकडे असलेल्या कौशल्याने.. या सगळ्याचा नकळतपणे माझ्यावर प्रभाव होता आणि पुढे तो माझ्या कामातही आला.. मनापासून व्यक्त होणं.. मनात ज्या गोष्टींची कालवाकालव होत आहे त्यांचं कागदावर उमटणं.. गाणं सुचत असेल वा म्हणावंसं वाटत असेल तर आनंदाने गाणे..माझ्यातल्या अक्षररेषेच्या प्रवासात सातत्याने बदल होत होता. पुढे काही दिवस मी गणपतीत ऑर्केस्ट्रात गाऊ लागलो.. जनमानसात येऊन आपली कला सादर करण्याची संधी शोधू लागलो.. यातूनच एक वेगळा आत्मविश्वास मिळाला, जो आज मी प्रात्यक्षिक करताना मला कामी येत असतो. आज लालबागचा राजा म्हणून प्रसिद्ध असलेल्या गणपतीची पहिल्या दिवशी पूजा करण्याचा मान मिळाला.. यातूनच १९३५-२०१३ पर्यंत मंडळाच्या प्रथेचा / कलाकारांचा / मूर्तीचा सहभाग असलेल्या पुस्तकाचं संकलन केलं. यातूनच ‘अक्षर गणेश’ ही कल्पना आली आणि चिंचपोकळीच्या चिंतामणीला एक वेगळं रूप देता आलं. आज देशभरातील लोक ‘चि’ पाहिला तरी ‘वो चिंतामणी है’ असं भक्तीने सांगतात..

या गणपती उत्सवाच्या १० दिवसांसाठी १० अक्षरी गणेश ही कल्पना दूरचित्रवाणीवर सादर करणार आहे.. हा सगळा भाग केवळ श्रद्धेचा नव्हता. मनापासून एखादी गोष्ट केली तर यश आपोआपच मिळत जातं.. फक्त थोडी वाट पाहायला लागते.. हेच यातून प्रत्ययाला येतं.

याच काळात एका प्रदर्शनात विजया राजाध्यक्ष यांची भेट झाली.. मी त्यांना आमंत्रण दिलं.. ते स्वीकारून त्या पाहायला आल्या. पुढे हे नातं एवढं घट्ट झालं की मी त्यांना माझी ‘अक्षराई’ म्हणू लागलो.. नेमकं काय वाचावं.. कसं वाचावं.. त्याचा मथितार्थ काय आणि तो थोडक्यात कसा मांडावा, हे बाईंनी मला नकळतपणे शिकवलं.. त्यांचा सहवास हा माझ्यासाठी खूप काही होता.. पुढे विंदांसारख्या महान माणसांच्या साहित्यावर काम करण्याची संधीही मला त्यांच्यामुळेच मिळाली.. अनेक नामवंत माणसं अक्षरामुळे जोडत गेलो. वि. वा. शिरवाडकर, पु. ल. देशपांडे, गुलजार.. कधी पुस्तकांची मुखपृष्ठे कव्हर तर कधी शीर्षकं.. प्रत्येक माणूस वेगळं शिकवत होता..

पुढे र.कृं.चीच री ओढत ज्ञानदेवांच्या ज्ञानेश्वरीवर काम करायचं ठरलं. खरं तर र. कृ. हे आमच्यासाठी ज्ञानदेव आणि रामदासांसारखेच होते. रघुनाथ जोशी ऊर्फ र.कृ. जोशी ऊर्फ आर. के. जोशी. मी ऊर्फ म्हणण्याचं कारण मूळ नाव रघुनाथ जोशी असलं तरी कवितेतील लोक त्यांना र.कृ. म्हणत आणि जाहिरात क्षेत्रातील लोक आर. के.. चित्रपटसृष्टीत राज कपूर आर. के. होते, तसेच जाहिरात क्षेत्रातले आर. के.. अक्षराचं खरं रूप, आकार हा किती वेगळा असू शकतो, हे त्यांच्याकडूनच पाहायला.. ऐकायला मिळाले. दृष्टीच्या पलीकडे जाऊन काय आणि कसा विचार करायचा हे त्यांनी शिकवलं.. दिल्लीला ‘अक्षरयोग’ या परिसंवादामध्ये एक एक अक्षर भव्यदिव्य शिल्पाकृतीप्रमाणे उभं केलं होतं. आणि विशेष म्हणजे इतक्या मोठय़ा प्रमाणावर होतं की त्या दिवसाची चर्चा त्या अक्षराच्या शिरोरेषेवर व्हायची. एक अक्षर म्हणजे एक व्यासपीठ ही कल्पना मनाला थक्क करणारी होतीच; परंतु विचार किती मोठा असायला हवा, हेसुद्धा सांगणारी होती.. आज मी जे काय करत आहे ते कितीही भव्यदिव्य असलं, तरी त्याची मूळ कल्पना किंवा स्फूर्ती आहे ती र.कृं.चीच!

संत ज्ञानेश्वर, तुकाराम, रामदास या तिन्ही संतांच्या विचारांवर काम करणं म्हणजेच काव्यसंपदेतून अक्षरसंपदा निर्माण करणं.. इतके मोठे विचार की आजही आपल्याला त्या विचारांच्या पलीकडे विचार करता येत नाही. काही चुकलं किंवा उदाहरण द्यायचं असेल तर परत तिथेच येतो.. मला असं नेहमी वाटतं की आपल्याला या शब्दांना लिहिताना स्पर्श करण्याचा जो योग आला आहे, भाग्य मिळालं आहे ते खरोखरच खूप मोठं आहे. ज्ञानेश्वरांनी वयाच्या १७ व्या वर्षी पसायदान लिहिताना जो विश्वव्यापी विचार मांडला आहे ते मांडताना एका सरळ रेषेत न लिहिता वक्राकार लिहिला.. मी अवगुणी, अन्यायी किती म्हणून.. असं म्हणत स्वतभोवती फिरणारा तुकाराम..

आणि शेवटी शून्यात विलीन होतो.

‘अणू रेणिया थोकडा। तुका आकाशाएवढा। ’ तुकारामांनी हे सगळं मांडताना स्वानुभव असो वा अनुभव हे मला अक्षरात मांडताना जगणं काय असतं, हे आपोआप कळायला लागलं. जगण्याची रीत बदलली की अक्षरात लिहिताना एक्स्प्रेशन किती बदलतात, कशी बदलतात, यातूनच ‘एक्स्प्रेसिव्ह कॅलिग्राफी’ म्हणजे काय हे मला अधिक कळू लागलं. शब्दावर कमी-अधिक जोर दिल्यास कसा फरक पडू शकतो, याचं आकलन झालं आणि पुढे याच जोरावर वेगवेगळ्या क्षेत्रांतील लोकांशी काम करण्यास सुरुवात केली. माझी वेबसाइट करताना तबल्याच्या ठेक्यावर अक्षरांनी ताल धरला.. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून

पंडित जसराज होते.. त्यांनी खूप कौतुक केलं.. त्यांना कल्पना आवडली.. आणि मग पुढे राहुल शर्मा, भवानी शंकर, आदित्य कल्याणपूर, सुनीता राव, डॉ.सलील कुलकर्णी, आनंद भाटय़े, जयतीर्थ मेवूंडी, आरती अंकलीकर, ‘सारेगम’च्या टीमबरोबर श्रावणातील गाणी.. अभिषेक तेंडुलकरच्या टीमबरोबर ऱ्हिदम आणि अक्षर.. असे अनेक प्रकार केले.. संगीताबरोबर एक नवीन टय़ुनिंग आणि त्यातून वेगवेगळे एक्स्प्रेशन.. जे ऐकतो ते कागदावर करायचं.. त्यातून प्रत्येक वेळी मिळणारा आनंद आणि अनुभव पुढच्या प्रत्येक गोष्टीसाठी उमेद देणारा असायचा. नांदेडचे आमदार हेमंत पाटील यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात चामडी

वाद्यांच्या सुराप्रमाणे  अक्षरांची अभिव्यक्ती कशी बदलत जाते हे मी दाखवत होतो. कधी आरती परांजपे; तर कधी तन्वी पालव यांच्या नृत्याबरोबर अक्षरसांगड  घालत होतो .. हे सगळं करत असताना मनातील भीती काढून पूर्णपणे स्वत:ला जगासमोर मांडा..पाहू द्या, हा मूलमंत्र जपला. यातूनच रशियातील एका आंतरराष्ट्रीय सेमिनारमध्ये ५ फुट बाय ४० फुटांचा पेपर अवघ्या तीन मिनिटांत अक्षरांकित झाला. तेव्हा जगभरच्या सुलेखनकारांनी तोंडात बोटं घातली होती. एवढय़ा मोठय़ा पेपरवर काय करणार हे लोकांच्या मनात असतानाच क्षणात त्या कागदावर स्वार होऊन अक्षरांची किमया काय असते तेही दाखवता आलं.

आज रशिया, शारजा, जर्मनी, अलेरिया, कोरिया या देशांच्या म्युझियममध्ये माझी अक्षरचित्रे आहेत.. जगभरातल्या अनेकांकडे माझ्या कामाचं कलेक्शन आहे.. मी जे काही शिकलो ते केवळ माझ्यापुरतं राहू नये, यासाठी वाशीमध्ये ‘अच्युत पालव स्कूल ऑफ कॅलिग्राफी’ सुरू केलं. छोटं आहे, पण देशभरातील १० वर्षांपासून १०० वयांपर्यंतचा कुठलाही माणूस आपल्या वेळेनुसार येऊन शिकू शकतो.. अक्षरांकडे केवळ लिखाण म्हणून न पाहता त्यातील सौंदर्य न्याहाळता आलं तर यातूनच थेरपी म्हणून त्याचा वापर करता येईल.. कारण चांगलं लिहिण्याकरिता चांगलं वाचावं लागतं..आणि मग परत लिहितो तेव्हा ते निव्वळ लिहिणं नसतं तर तुमच्या मनातलं ते अक्षरचित्र असतं..

नुकतंच ‘जनगणमन’ या लघुपटाची निर्मिती केली. प्रत्येक भारतीयांच्या मनात नितांत आदर असलेली गोष्ट म्हणजे राष्ट्रगीत.. रवींद्रनाथ टागोरांच्या लेखणीतून उतरलेले शब्द म्हणजे संपूर्ण देश कसा आहे हे बालपणापासून आजतागायत म्हणताना नेहमी अभिमानच वाटला. हे जेव्हा अक्षरातून लिहायला घेतलं तेव्हा अक्षरातील, शतकातील प्रत्येक वळण मनाचा वेध घेत होतं..अभिमानाने ऊर भरून येत होता.. शब्दांचा प्रवास सुरूच होता..सुरू आहेच.

अच्युत पालव, सुलेखनकार

designs.resonance14@gmail.com