त्या वर्षी तुळशीबाग मित्र मंडळाचा चलो मच्छिंदर गोरख आया.. हा हलता देखावा होता. शिल्पकार डी. एस. खटावकर यांची प्रतिभा आणि कला एकवटलेल्या त्या देखाव्यात खटावकरांनी सारी मायानगरी अप्रतिम साकारली होती. देखाव्यातील प्रत्येक स्त्रीला भरजरी साडय़ा, शालू नेसवण्यात आले होते. खूप प्रयत्न झाले; पण एका मूर्तीची साडी मात्र खटावकरांच्या मनात काही भरत नव्हती. अखेर त्यांनी तडक घर गाठलं. घरातला एकमेव शालू घेऊन ते मंडपात आले. शालू फाडून तो मूर्तीला नेसवण्यात आला आणि मग खटावकरांच्या मनाप्रमाणे साकारला; पण तो शालू होता खटावकरांच्या पत्नीचा आणि तोही लग्नातला..
पुण्याच्या गणेशोत्सवावर ज्या कलाकारांनी अमीट ठसा उमटवला आहे, त्यांची आठवण प्रत्येक उत्सवात होतेच. शिल्पकार डी. एस. खटावकर हे त्यातलं एक अग्रगण्य नाव. या कलाकाराचं भाग्य असं, की मुलगा विवेक आणि विवेकचे दोन्ही मुलगे कलेच्याच क्षेत्रात चांगली कामगिरी करत आहेत. त्यामुळेच तीन पिढय़ांची कलाकारी हे खटावकर घराण्याचं भूषण ठरलं आहे. खटावकर सरांचं वय आता पंचाऐंशी आहे; पण अगदी यंदाही तुळशीबाग मंडळाने जो देखावा केला आहे, त्यात याही वयात त्यांचा सहभाग आहेच. उत्सव जवळ आला, की खटावकर स्वस्थ बसूच शकत नाहीत. खटावकरांनी मंडळाचं काम १९५२ मध्ये पहिल्यांदा केलं आणि ते आजतागायत तितक्याच निरपेक्षपणे सुरू आहे.
पुण्यातल्या सार्वजनिक उत्सवात धार्मिक, पौराणिक आणि हलत्या देखाव्यांची जी परंपरा रुजली त्यात खटावकरांचा वाटा मोठा आहे. तुळशीबाग मंडळाच्या अमृतमहोत्सवी वर्षांत त्यांनी साकारलेला भारतीय शिल्पकलेचं सौंदर्य हा देखावा काय किंवा त्यांनी साकारलेले कीचकवध, गणेशरूपी राम, श्रीकृष्णाचं विश्वरूपदर्शन.. असे देखावे काय. त्यांच्या गाजलेल्या देखाव्यांची ही यादी खूप लांबत जाईल. अभिनव महाविद्यालयात फाइन आर्ट विषयाचे प्राध्यापक म्हणून खटावकर यांनी पस्तीस वर्ष काम केलं आणि या काळात त्यांनी शेकडो शिल्पकार घडवले. त्या विद्यार्थ्यांनी पुढे हजारो शिल्प घडवली.
हौसेनं शिकायला येणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांनी मुक्तहस्ते कलेचं शिक्षण दिलं. काहीही लपवून ठेवलं नाही. हे तत्त्व त्यांनी मुलगा विवेकच्या बाबतीतही पाळलं. प्रसंगी मुलाचे लाड पुरवले नाहीत; पण कलेतील गुरू म्हणून त्यांनी विवेकला खूप मोठा ठेवा दिला. देखाव्याचं काम करताना रात्री उशीर झाला, की आनंदानं घरी दहा-पंधरा विद्यार्थ्यांना जेवायला घेऊन जाणं हा तर सरांचा परिपाठच. आपल्याकडचं ज्ञान दुसऱ्याला देत राहा, म्हणजे आपलं ज्ञान वाढतं आणि सार्वजनिक काम करताना डोक्यावर बर्फ व तोंडात साखर ठेवा ही दोन सूत्रं त्यांनी कलाकारांना शिकवली. गणेशोत्सवातील काम जेवढं श्रद्धेनं कराल, मनापासून कराल, निरपेक्षपणे कराल तेवढं यश येईल, ही त्यांची शिकवण.
साठ वर्षांपूर्वी तुळशीबागेच्या गणेशोत्सवाचा देखावा साकारण्यासाठी खटावकरांनी मातीत हात घातले. खरंतर पुढे शिल्पकार म्हणून त्यांचा लौकिक झाला. प्राध्यापक म्हणूनही कारकीर्द यशस्वी होत होती. हातून गुणी शिल्पकार घडत होते. तरीही उत्सवात राबण्याची ऊर्मी जी एकसष्ट वर्षांपूर्वी होती तीच आजही कायम आहे. असे कलाकार म्हणजे पुण्याच्या उत्सवाचं भूषणचं.

AAP MP Sanjay Singh
“केजरीवालांचा तुरुंगात छळ होतोय”, आप खासदार संजय सिंहांचा आरोप; म्हणाले, “त्यांच्या पत्नीलाही…”
Caste end thought of Babasaheb Ambedkar and Mahatma Jyotiba Phule
फुले-आंबेडकरांचा जाती-अंत विचार
Chaturang article a boy friendship with two female friends transparent and free communication
माझी मैत्रीण : पारदर्शक संवाद!
nagpur crime news, suspicion of character nagpur
प्रेमविवाहानंतर पत्नीच्या चारित्र्यावर संशय; पतीने पत्नीला पाजले विष, पोलिसांनी…