* ऐन उमेदीतील २४ वर्षांच्या नंदनला २००२ मध्ये ए.एम.एल. (अ‍ॅक्युट मायलॉइड ल्युकेमिया)चे निदान झाले तेव्हा आपल्या एकुलत्या एक मुलाचे आयुष्य संपले या नराश्यात बुडूनच त्याच्या आईने आमच्या ओ.पी.डी.त प्रवेश केला. टाटा रुग्णालयात नुकत्याच  सुरू केलेल्या केमोथेरपीचे साइड इफेक्ट्स व ल्युकेमियाचा आजार यामुळे नंदनचे वजन ३ महिन्यांत ५ किलोने कमी झाले होते. याशिवाय सर्दी, ताप, अशक्तपणा, पाय दुखणे,  शौचास पातळ होते व गुदमार्गाची आग होणे या दुखण्याने तोही त्रस्त झाला होता. आयुर्वेद व अ‍ॅलोपॅथी या दोन्ही चिकित्सापद्धतींचा अवलंब करून आपण नंदनला या कष्टदायक  दुखण्यातून बाहेर काढण्याचा व त्याचे आयुष्य पूर्ववत सुरळीत करण्याचा आटोकाट प्रयत्न करू, असे आश्वासन दिल्यावर त्याने व त्याच्या आईने आयुर्वेदिक औषधोपचाराच्या  सातत्यात खंड पडू दिला नाही. परिणामी, कॅन्सरवर नियंत्रण मिळवून, आपल्या  जीवनसाथीस पूर्वायुष्यातील आजाराची पूर्ण कल्पना देऊन नंदन विवाहबद्ध झाला व दोन वर्षांपूर्वी सुदृढ कन्यारत्नास जन्म दिला. वयाच्या १० व्या वर्षी २००२ मध्ये ए.एम.एल.चे  निदान झालेला मंगेश, ८व्या वर्षी २००० मध्ये ए.एम.एल.चे निदान झालेली लता व २००७ मध्ये १२व्या वर्षी ए.एम.एल.चे निदान झालेला व आता वैद्यक शाखेच्या अंतिम  वर्षांला शिकत असलेला सुयोग ही सारीच बोलकी उदाहरणे ल्युकेमियाच्या चिकित्सेत समन्वयात्मक चिकित्सापद्धतीने योगदान स्पष्ट करतात.
मागील लेखात आपण ए.एम.एल., सी.एल.एल. व सी.एम.एल. या ल्युकेमियाच्या प्रकारात रक्तपेशींत असणारा भेद पाहिला. मात्र ल्युकेमियाच्या सर्वच प्रकारांत संभाव्य कारणे व लक्षणे सारखीच असतात. वयोगटाचा विचार करता ए.एम.एल.चे प्रमाण ४५ वर्षांनंतर, सी.एल.एल.चे प्रमाण ७२ वर्षांनंतर व सी.एम.एल.चे प्रमाण ६५ वर्षांनंतर अधिक आढळते. बालकांत ल्युकेमियाच्या कारणांचा विचार करता बाल्यावस्थेत झालेले जनुकीय  बदल हे प्रमुख कारण असून प्रौढावस्थेतील रुग्णांत पर्यावरणातील विपरीत घटक व अयोग्य जीवनशैली ही महत्त्वाची संभाव्य कारणे आढळतात.
आयुर्वेदानुसार ल्युकेमियाच्या चिकित्सेचा विचार करता पित्तदोष व रक्तधातूची दुष्टी नष्ट करून त्यांचे प्रसादन करणारी, रक्तधातूचा अग्नी प्राकृत ठेवणारी, रक्तवह स्रोतसाचे मूलस्थान असलेल्या यकृत व फ्लीहा या अवयवांची शुद्धी करून त्यांना बल देणारी, रक्ताची निर्मिती ज्या अस्थिमज्जेत होते, त्यात प्राकृत रक्तपेशांची निर्मिती व्हावी यासाठी त्यास सक्षम करणारी व या सर्व शरीरघटकांच्या मुळाशी असलेल्या जाठराग्नीस बल देणारी चिकित्सा लाभदायी ठरते. यात पित्तदोष व रक्तधातू यांच्या प्रसादनासाठी अनंतमूळ, दाडिम (डािळब), आवळा, शतावरी, नवायास लोह; रक्तधातूच्या अग्नीचे दीपन करण्यासाठी दाडिमादि घृत, कुमारी आसव; यकृताच्या शुद्धीसाठी कुमारी (कोरफड), कुटकी, आरोग्यवíधनी; फ्लीहाशुद्धीसाठी शरपुंखा; अस्थिमज्जेचे कार्य सुधारण्यासाठी  प्रवाळ व जाठराग्निस बल देण्यासाठी दाडिमाष्टकासारखी औषधे उपयुक्त ठरतात. उपरोक्त शमन व रसायन चिकित्सेने ल्युकेमियाच्या रुग्णाचे बलवर्धन झाल्यावर रक्त व पित्ताच्या शुद्धीसाठी रक्तमोक्षण व विरेचन तसेच वातदोषाच्या अनियंत्रित पेशींच्या निर्मितीस प्रतिबंध घालण्यासाठी बस्ती हे पंचकर्म उपक्रम प्रतिवर्षी योग्य त्या ऋतूत वैद्यकीय देखरेखीखाली केल्यास शरीरशुद्धी होऊन ल्युकेमियाचा पुनरुद्भव टाळण्यास मदत होते.
ल्युकेमियात सर्वसामान्यत गोड, कडू व तुरट चवीचा व शीत गुणाचा आहार प्रशस्त! आहारात केशर घालून सिद्ध केलेले गाईचे दूध, गाईच्या दुधाचे तूप, ताजे लोणी व खडीसाखर; उकळून कोमट केलेले पाणी, उन्हाळ्यात चंदन वाळा घातलेले पाणी; साठेसाळीचा भात, केशरी भात, मुगाचे वरण, भूक व पचन चांगले असल्यास मुगाचा गोड शिरा व लाडू, मसूरडाळीचे वरण अथवा सालासकट मसूरडाळीचे कढण; बीट-गाजर-मुळा यांची कढीपत्ता, आले, लसूण, मिरे, धणे, जिरे, पुदिना ओवा घालून केलेली कोिथबीर या मसाल्याच्या पदार्थानी पाचक व चविष्ट केलेले सूप किंवा बीट-गाजर-मुळ्याची िलबाचा रस व ऑलिव्ह ऑइल घातलेली कोिशबीर; वाफवून तूप-जिऱ्याची फोडणी दिलेल्या दुधी, पडवळ, दोडका, भेंडी, सुरण या भाज्या; डािळब, आवळा, सफरचंद, अंजीर, खजूर, द्राक्ष, काळ्या मनुका, जरदाळू, खारीक ही फळे व सुका मेवा; द्राक्षासव किंवा खर्जुरासव, कोकमाचे सार, मूगचे पीठ लावलेली गोड व ताज्या ताकाची कढी, बीट-गाजर-कोहळा-दुधी यांच्या वडय़ा, हळद व आवळ्याचे लोणचे, िलबाचे उपवासाचे लोणचे, कढीपत्त्याची व कारळाची चटणी, मुगाचा व नाचणीचा भाजलेला पापड, तांदळाची उकड, नाचणीचे सत्त्व व मांसाहार घेणाऱ्या व्यक्तींनी वर सांगितलेल्या मसाल्याच्या पदार्थाची सिद्ध केलेले पायासूप किंवा लिव्हरसूप घ्यावे. आहार ताजा, गरम, प्रसन्नचित्तेने व एकाग्रमनाने सेवन करावा. बेकरीचे पदार्थ, आंबवलेले पदार्थ, तळलेले पदार्थ व जळजळीत पदार्थ पूर्णत: वज्र्य करावे. ‘‘हितभुक् मितभुक् स्यात् ।’’ या वचनाप्रमाणे हितकर व मर्यादित आहार घ्यावा. तसेच दीर्घकाळ उष्ण संपर्कात काम करणे, दीर्घकाळ उपवास-जागरण-दिवसा झोपण्याची सवय, अतिक्रोध-चिडचिडा स्वभाव, अतिरिक्त मानसिक ताण या सर्व गोष्टी रक्तदुष्टी करीत असल्याने टाळणे योग्य. याबरोबरच सकाळी मोकळ्या हवेत फिरण्याचा सोसवेल इतका व्यायाम, प्राणायाम, तज्ज्ञांच्या सल्ल्याने योगासने व चित्तवृत्ती प्रसन्न ठेवण्यासाठी आवडत्या छंदात व कामात व्यग्र राहणे हितकर!