भारत आता मधुमेहाची राजधानी बनला आहे, असं म्हणतात. पुढच्या पिढीला मधुमेह होऊ नये म्हणून काय करावं लागेल?
हा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण एकदा एखादी व्यक्ती मधुमेही झाली की त्या व्यक्तीचे परतीचे दोर कापले गेलेले असतात. म्हणूनच तो होऊ नये यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करणं जास्त चांगलं आहे. इथं एक लक्षात घेतलं पाहिजे की प्रत्यक्ष रक्तातली साखर वाढण्यापूर्वी किमान आठ ते दहा र्वष शरीरात मधुमेहाला पोषक वातावरण निर्माण होतं. म्हणजे आज मधुमेह नको असेल तर त्याला प्रतिबंध करण्याची सुरुवात किमान दहा र्वष तरी आधीपासून व्हायला हवी. आताशा मधुमेह विशीत आणि तिशीत दिसतोय. याचा अर्थ आपल्याला मुलांच्या वयाच्या दहाव्या वर्षांपासूनच मधुमेह होऊ नये यासाठी आखणी करावी लागणार. दहाव्या वर्षी एखादी गोष्ट मुलांच्या गळी उतरवायची हे काम अवघड आहे. त्यासाठी खूप मेहनत जरुरी आहे यात शंका नाही. आजारी नसताना पथ्य पाळायला लावणं सोपं नसतं. मधुमेह नियंत्रणात राखण्यासाठी आवश्यक असलेली त्रिसूत्री म्हणजे पथ्य आहार, नित्य विहार आणि सत्य विचार यांचं पालन केलं की किमान मधुमेह होणं लांबणीवर पडू शकतं हे निश्चित.

मधुमेहाच्या विळख्यावर याने मात करता येईल?
असा दावा नक्कीच करता येणार नाही. त्यासाठी समाजाच्या व्यवहारात बरेच मूलभूत बदल करावे लागतील. मुलांना लांब पल्ल्याच्या आजारांबाबत सज्ञानी करणं जरुरीचं आहे. ज्ञान हा त्यांच्यात बदल घडवण्याच्या अपेक्षेचा पाया असला पाहिजे. आपल्या आयुष्यात आपण विशिष्ट गोष्टी का करायच्या, असं का वागायचं हे त्यांचं त्यांना समजलं तर त्यांच्यात आतून फरक पडेल. शाळांनी देखील थोडीशी मदत करावी. घरच्या माणसांपेक्षा लहान मुलं शिक्षकांचं जास्त ऐकतात.
सरकारी पातळीवर अनेक प्रयत्न करता येतील. अन्नप्रक्रिया उद्योग लोकांना नेहमीच आरोग्यदायी आहाराकडे वळवतो असं नाही. त्यांच्या उत्पादनांकडे बारीक लक्ष ठेवावं लागेल. निदान शाळांच्या उपाहारगृहांमध्ये पेप्सी किंवा कोलाच्या ऐवजी फळांचे रस आणि वडापाव, सामोसा, वेफरच्या बदल्यात उपमा अथवा पोळीभाजी देता येतील. फळं आणि भाज्यांसारख्या वस्तूंच्या किमती सर्वसाधारण माणसांच्या आवाक्यात राहतील हे पाहता येईल. मुलांना खेळायच्या संधी अधिक असायला हव्यात. तितकी मदानं हवीत. मुलांना मदानात नेण्याचे प्रयत्न पालकांकडून व्हायला हवेत. मुलांच्या मनावर फार ताण येणार नाही अशा प्रकारचं वातावरण हवं. याने केवळ मधुमेहच नव्हे तर रक्तदाबासारखे अनेक लांब पल्ल्याचे आजार आटोक्यात ठेवण्यास, किमान ते कमी वयात होणार नाहीत याची निश्चिती करण्यात याने मदत होईल.

tuberculosis marathi news, tuberculosis genetic sequencing marathi news
क्षयरोग उपचारामध्ये जनुकीय क्रमनिर्धारण महत्त्वपूर्ण, औषध प्रतिरोधकातील बदल समजण्यासाठी मदत
upsc exam preparation tips in marathi
UPSC ची तयारी : पर्यावरण पारिस्थितिकी, जैवविविधता
Mentally healthy Psychotherapy Mental health problems
ताणाची उलगड: मानसिकदृष्ट्या निरोगी आहोत का?
Can those on insulin participate in exercise
व्यायामापूर्वी खावे की नंतर? मधुमेही व्यक्तीने व्यायाम करावा का? व्यायाम करताना काय काळजी घ्यावी, डॉक्टरांकडून जाणून घ्या

ज्यांना आधीच मधुमेहानं ग्रासलं आहे त्यांचं काय?
एकदा एखादा आजार झाला की त्याचे दूरगामी परिणाम होण्यापासून संरक्षण करणं याला सेकंडरी प्रिव्हेन्शन असं म्हणतात. मधुमेहाच्या बाबतीत या गोष्टीला अनन्य साधारण महत्त्व आहे. कारण तो अनेक इंद्रियांवर परिणाम करतो. रक्तातल्या ग्लुकोजसोबत रक्तदाब, कोलेस्टेरॉल, शरीराचं वजन यावर नियंत्रण राखणं जरुरीचं आहे. मधुमेह म्हणजे रक्तात वाढलेली साखर. रक्त शरीरभर फिरतं. त्यामुळं शरीराच्या प्रत्येक इंद्रियावर परिणाम होणारच. म्हणूनच निदान महत्त्वाच्या अशा सर्व इंद्रियांवर पूर्ण लक्ष ठेवणं आवश्यक आहे. हृदय, मूत्रिपड, डोळे, पाय, यकृत विसरून चालणार नाही. यावर लक्ष ठेवायचं म्हणजे नेमकं काय करायचं, कुठल्या तपासण्या करायच्या, कधी करायच्या, किती वेळाने करायच्या याचं प्रत्येक रुग्णाला लागू पडेल असं वेळापत्रक नसतं. रुग्णाच्या गरजेनुसार तो निर्णय घ्यायचा असतो. यासाठी आपल्या डॉक्टरना भेटणं, त्यांच्याशी सल्लामसलत करणं चांगलं. महत्त्वाची बाब म्हणजे वेळेवर औषधं घेणं. कोणी सोम्या गोम्यानं सांगितलं म्हणून औषधं बदलू किंवा बंद करू नका. भले कुठल्याही प्रकारची औषधं घ्या परंतु ती डॉक्टरना विचारून घ्या. मधुमेहासारख्या आजारात खूप दिवस औषधं घ्यावी लागत असल्यानं तुम्ही कंटाळू शकता. पण हीच तर मेख आहे. तुम्ही धीरानं घेणं आवश्यक आहे.

– डॉ. सतीश नाईक
dr.satishnaik.mumbai@gmail.com