प्रत्येक माणसाच्या व्यक्तिमत्त्वात इतर अनेक गुणांप्रमाणे एक महत्त्वाचा गुण असतो, तो म्हणजे त्याचा अहंभाव. माणसाने या अहंभावाचा वापर करून आजपर्यंत प्रचंड ऊर्जेने अनेक क्षेत्रांत प्रगती केली आहे. कलाकार, शास्त्रज्ञ, संशोधक, विचारवंत, सामाजिक आणि राजकीय नेते, उद्योजक यांच्यात असलेले अनेक गुण आपण तपासतो. पण त्या सर्वामध्ये असलेला एक महत्त्वाचा घटक आपण ओळखायला आणि मान्य करायला लाजतो किंवा संकोचतो. तो म्हणजे- त्या माणसाला असलेला अहंभाव (ego) आणि त्या व्यक्तीने आपल्या ईगोचे आपल्या कामामध्ये केलेले रूपांतर. प्रत्येक माणसाकडे हा अहंभाव असला तरी सर्वच माणसांना त्याचा चांगला वापर करण्याची बौद्धिक आणि नैसर्गिक कुवत नसते. बुद्धिमान माणसे आपली ताकद, बुद्धी, त्यामुळे कमावलेले ज्ञान, त्यावर कमावलेली संपत्ती, त्या ओघाने येणारी सत्ता या सगळ्याचा वापर काहीतरी नवे निर्माण करण्यासाठी करत राहतात. ते करताना त्यांच्या मदतीला येतो तो त्यांच्या मनातील पोसलेला आणि सतत घासूनपुसून ताजा केलेला अहंभाव. संकुचित वृत्तीच्या, परंपरांना शरण जाणाऱ्या आणि अर्धवट संतवाङ्मय वाचून पोसलेल्या आपल्या मध्यमवर्गीय मूल्यव्यवस्थेत आपण सामान्य माणसे मानतो त्याप्रमाणे अहंभाव ही काही चुकीची भावना नाही. तिला बरोबर-चूक किंवा चांगली-वाईट असे ठरवता येणार नाही. कारण ती फक्त एक भावना आहे. भावनेला गुण देता येत नाही. भावनेचा वापर करून केलेल्या क्रियेला गुणदोष देता येतात. अहंभाव ही फार आवश्यक आणि उपयोगी भावना आहे. दुर्दैवाने आपल्या सामाजिक विचारपद्धतीत आणि शिक्षणात ईगोला योग्य पद्धतीने आणि योग्य प्रमाणात जपून, पोसून मोठे करीत कामाची ताकद वाढवायचे शिक्षण कुणीच कुणाला देत नाही. कुटुंबातही नाही आणि बाहेरही नाही. त्यामुळे हट्टीपणा, हिंसक परंपराप्रियता आणि नाठाळपणा करणे यापलीकडे या भावनेचे काही काम असू शकते याची जाणीव अनेकांना नसते.

मी ईगोने फुललेली अनेक माणसे उत्तम कलाकृती तयार करताना, लिहिताना, भूमिका करताना, वेगवेगळे शोध लावताना पाहिली आहेत. मला हे जे वाटते आहे ते आत्ता सर्वात महत्त्वाचे आहे, मी महत्त्वाचा आहे, माझा विचार हा नवा, ताजा आणि आवश्यक आहे, ही जाणीव जर नसेल तर कुणीही, कोणतीही चांगली नवनिर्मिती करू शकत नाही. ईगोचा वापर करताना दुसऱ्या व्यक्तीला कमी लेखणे महत्त्वाचे नसते, तर स्वत:ला महत्त्वाचे वाटणे हे फार आवश्यक असते. नवनिर्मितीसाठी ती एक फार अत्यावश्यक गोष्ट असते. अनेकदा कलाकार निर्मिती करताना शब्द, रंग, आकार, चाल यापैकी कशाचेही प्राथमिक रूप सुचले की आनंदाच्या भरात जातो आणि त्या उत्साहाच्या इंधनावर तो त्या प्राथमिक सुचलेल्या घटकाला आकार देत बसतो; ज्यातून काही वेळा नवनिर्मिती होण्याची

article about mpsc exam preparation guidance mpsc exam preparation tips in marathi
MPSC मंत्र : अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व – परीक्षास्वरूप आणि अभ्यासक्रम
loksabha election 2024 Peoples issues banished from campaigning in Vidarbha
विदर्भात जनसामान्यांचे प्रश्न प्रचारातून हद्दपार
All information about OpenAI GPT 4 Vision in marathi
प्रतिमा, मजकूर आणि ध्वनी अशा तिन्ही गोष्टींवर करणार प्रक्रिया; GPT- 4 Vision नक्की काय आहे?
mpsc mantra environment question analysis career
mpsc मंत्र: पर्यावरण प्रश्न विश्लेषण

शक्यता तयार होते. एखाद्या उद्योजकाला, एखाद्या इंजिनीअरला, एखाद्या वास्तुरचनाकाराला, एखाद्या मुरलेल्या राजकारणी माणसाला, कुशल संघटकाला याच पद्धतीच्या विचारप्रक्रियेतून जावे लागते. त्याला आपला अहंभाव नीट वापरून नव्या कल्पनेची रचना आणि कामाची आखणी करावी लागते. आपण आपल्याला महत्त्वाचे मानले नाही तर आपल्या विचारांना इतर कुणीही महत्त्वाचे मानणार नसते. नवा विचार सुचताना, नवे आडाखे मांडले जाताना, नवीन भूमिका लक्षात येताना आपण संपूर्ण एकटे असतो. आपल्याला काम करण्यासाठी स्वत:ला फुलवून घ्यावे लागते. समोरच्या माणसाला आपल्याला सुचलेले दिसत नसल्याने, किंवा तसे दिसण्याची त्याची प्रज्ञा नसल्याने आपल्याला अहंभाव वापरून आपले नवे म्हणणे आत्मविश्वासाने साकारावे लागते. लोकांसमोर मांडावे लागते. त्यांना ते पचले नाही, आणि जरी आपल्या कामात अपयश आले, तरी त्यावर मात करून पुन्हा नवीन कामाला सज्ज व्हावे लागते. त्यासाठी खूप मोठा ईगो आपल्यात असावा लागतो. समानतेची भावना कोणत्याही निर्मितीच्या प्रक्रियेला पोषक नसते. समानता हा खूप मोठा रोमान्स आहे, हे आता काळाने आपल्याला शिकवलेच आहे. ज्यांना अहंभाव फुलवून कष्टाने एकटय़ाने काम करता येत नाही, ती अनेक माणसे समानतेचे भिरभिरे हातात घेऊन एकत्र येतात आणि सामूहिक वगैरे पद्धतीने नवनिर्मिती केल्यासारखी करून मग पुन्हा घरी परत जातात.  ज्या ईगोमुळे घरातले जुने म्हातारे कालबा परंपरा आणि रूढी पाळत घरातल्या सर्व माणसांची आयुष्ये नासवत बसतात, ज्या ईगोमुळे दुय्यम दर्जाचे सेलेब्रिटी लोक बोलावलेल्या कार्यक्रमांना उशिरा जातात, घरी आपल्या बायकांना मारहाण करतात, त्याच ईगोमुळे कॅमेरासमोर उभा असलेला किंवा उघडणाऱ्या पडद्यासमोर रंगमंचावर उभा असलेला नट अप्रतिम अदाकारी दाखवून जातो. त्या ईगोमध्ये फरक नसतो, तर तो वापरायला शिकण्याचे ज्ञान सामान्य माणसाला नसते. ते ज्ञान आणि ती जाणीव फक्त समाजातील काही ठरावीक बुद्धिमान माणसांना आणि प्रज्ञावंत कलाकारांनाच असते. कारण अहंभाव ही दुधारी तलवार असल्याने सुसंस्कृत आणि सुशिक्षित लोक काम झाले की ती म्यान करून ठेवतात. आणि असंस्कृत, अशिक्षित किंवा सामान्य बुद्धीचे लोक ती उघडी तलवार घेऊन बाजारात कोथिंबीर आणायलासुद्धा जाऊ  शकतात.

फेसबुकवर जाऊन अनेक माणसे काय बोलतात, समीक्षा किंवा मतप्रदर्शन करतात, तात्त्विक वादावादी करतात, हे पाहिले की तलवारीचा आणि कोथिंबिरीचा मुद्दा आपल्या लक्षात येऊ  शकतो.

आपण सध्या आपला आब टिकवून ठेवणे विसरत चाललो आहोत. इंटरनेटवरील समाजमाध्यमांवर आपल्या सुरू असलेल्या अर्निबध आणि मोकाट शाब्दिक संचारामुळे आपल्या जगण्याचा आब हरवला आणि आपल्या मतांची किंमत रसातळाला गेली आहे. दूरदृष्टी असणारी चाणाक्ष माणसे या समाजमाध्यमांवर फार विचारपूर्वक, आखून, मोजूनमापून व्यक्त होतात. आणि उरलेले सर्व लोक सकाळी मोकाट कुत्र्यांसमोर ब्रेड टाकला की ती कशी वसवस करतात, तसे वागू लागतात. याचे कारण आपल्याला समाजाने गांभीर्याने घ्यावे यासाठी आपल्यापैकी अनेकजण जिवाच्या आकांताने धडपड करीत आहोत. समाजमाध्यमांवरील आपला अनियंत्रित शाब्दिक संचार हा काही वेळाने व्यसनाचे स्वरूप घेतो. आणि मग व्यसनी माणूस जसा व्यसनासाठी इस्टेट विकायला मागेपुढे पाहत नाही, तसे आपण नकळत या ठिकाणी स्वत:चा अहंभाव पणाला लावून खेळ खेळू लागतो. सतत बदलत्या काळामुळे जुन्या होत जाणाऱ्या अनेक जाणत्या व्यक्ती मला रोज सकाळी या भिंतीवर आपली भरपूर धुलाई करून घेताना दिसतात. त्यांना काहीही करून आपला स्व या क्रूर, वेगाने बदलत्या काळात जपायचा असतो. पण त्यांना हे कळत नसते, की कुणीही अर्निबधपणे आणि काळ-वेळ न ओळखता आपले विचार रोजच मांडू लागले की तुम्ही पुढील पिढीचे करमणुकीचे साधन बनता. अशा अनेक म्हाताऱ्या विचारवंतांना, कालबा समीक्षकांना, जुन्या कार्यकर्त्यांना, काळाचे भान सुटलेल्या नटांना, दमलेल्या लेखकांना, स्वप्नील कवींना उसकवून, रोज सकाळी बोलायला भाग पाडून त्यांची करमणूक पाहत फिदीफिदी हसत बसणारी तरुण पिढी जन्माला आली आहे. ती पिढी तुमचा अहंभाव दुखावते. मग तुम्ही तुमचा उरलेला सगळा अहंभाव पणाला लावून आपले शहाणपण त्यांना शिकवीत बसता. दुखावले जाता. आणि हाच खेळ खेळणे हे त्या बसमधून ऑफिसला निघालेल्या तरुण मुलांचे उद्दिष्ट असते.

शब्दाला महत्त्वाचे मानणाऱ्या, कामाची मूल्ये जपणाऱ्या, पण कालबा झालेल्या माणसाला स्वत:चा अहंभाव सांभाळणे सध्याच्या काळात खूप अवघड होऊन बसले आहे. तो अहंभाव जपण्याची तारेवरची कसरत करीत, तरुण पिढीशी संवाद साधण्याचे प्रयत्न करीत, आपण जुने झालेलो नाही आणि आपण कधीही जुने होणार नाही, हे नव्या पिढीला पटवत रोज जगणे सोपे नसते. कारण आपण जुने झालो आहोत हे आपल्याला माहिती असते. अशा वेळी रंगीत टी-शर्ट घालून लहान मुलांच्यात जाऊन नाचले तर आपण वेडेबिद्रे आणि भेसूर दिसतो, हे सध्या अनेक लोकांना कळेनासे झाले आहे. घरात बसून एकटे वाटते आणि बाहेर गेले की भांबावून जायला होते, त्यामुळे समाजमाध्यमांवर नवेपणाची लिपस्टिक लावून अनेक लोक ‘मला तुमच्यात सामील करून घ्या’ असे म्हणण्याचा केविलवाणा प्रयत्न करताना दिसतात. त्या लोकांनी स्वत:चा आब राखून आपल्या अहंभावाला नीट जपणे फार आवश्यक आहे.

सचिन कुंडलकर  kundalkar@gmail.com